बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कंपन्यांना मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम

गंभीर गुन्हे दाखल करण्याचे सुतोवाच मुंबई : राज्यात १ जुलै हा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस, हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यांना आणि राष्ट्रीय डॉक्टर्स

गंभीर गुन्हे दाखल करण्याचे सुतोवाच

मुंबई :  राज्यात १ जुलै हा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस, हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यांना आणि राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना मी विनम्रपणे नमस्कार करतो, हे दोघेही आपला जीव वाचवणारी माणसे आहेत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,आपल्या सर्वांसाठी मेहनत करून, घाम गाळून जो शेतकरी अन्नधान्य पिकवतो,  त्या शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या बोगस बियाणांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. शेतकरी राबराब राबून जमीनीत बियाणे पेरतो, आपल्यासाठी अन्न धान्याचे उत्पादन करतो. परंतू त्याला बोगस बियाणे देऊन त्याचे नुकसान जर कुणी करत असेल तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांच्याकडून शेतकऱ्याची नुकसान भरपाई वसुल केली जाईल.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, निवडणूकांमुळे आणि नंतर कोरोनामुळे काही भागातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नव्हता. पण आता त्यांनाही कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

कोरोनाशी लढतांना कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. कोकणात पाहणी करण्यासाठी गेलो असतांना हे वादळ किती भीषण होतं हे जाणवलं. पण आपल्या शासकीय यंत्रणेने खुप चांगलं काम करत निसर्गचक्रीवादळग्रस्तांना दिलासा देण्याचे व कमीत कमी प्राण हानी होईल याची काळजी घेतल्याचे दिसून आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. समुद्रातील सर्व मच्छिमार बांधवांना किनाऱ्यावर आणण्यात यश आल्याची माहिती ही त्यांनी दिली. कोकणातील फळबागा, घरे उध्वस्त झाली आहेत. त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.