मुंबईत मराठी शाळा आणि माणसांची अवस्था बिकट; भाजप आमदार अमित साटम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईत मराठी शाळा आणि मराठी माणसांची अवस्था बिकट झाली आहे. मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला, तशीच अवस्था मराठी शाळांची आणि भाषेची झाली आहे असा गंभीर आरोप भाजप नेते आमदार अमित साटम यांनी केला आहे.

  मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षापासून मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणा-या शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि मराठी भाषा विकास मंत्री आहे. शिवाय मुंबईत महापालिकेतही ३०वर्षा पासून शिवसेना सत्तेत आहे. मात्र मुंबईत मराठी शाळा आणि मराठी माणसांची अवस्था बिकट झाली आहे. मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला, तशीच अवस्था मराठी शाळांची आणि भाषेची झाली आहे असा गंभीर आरोप भाजप नेते आमदार अमित साटम यांनी केला आहे.

  मराठी शाळांच्या व्यथा आणि चिंता

  आमदार साटम यानी याभात मुख्यमंत्र्याना पत्र पाठविले आहे त्यात त्यांनी मराठी भाषेच्या शाळांच्या दुरावस्थेबाबत व्यथा आणि चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सन २०१० – ११ मध्ये मुंबईत मराठी शाळांची संख्या ४१३ होती आणि विद्यार्थी संख्या १,०२,२१४ होती. सध्या सन २०२०-२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त ३६,११४  इतकी कमी झाल्याचे साटम यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

  याला योगायोगच म्हणावा की मराठीचे नशिब

  आ. साटम मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रात म्हणतात की, आपणास ज्ञात असेल की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांनंतर दि.१ मे १९६० रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईत असलेले हुतात्मा स्मारक आपणास ‘मराठी माणसाने‘ मराठी बाण्यासाठी दिलेल्या बलीदानाची सदैव आठवण करून देत असेलच! सत्ताधारी शिवसेनेने मराठी आस्मितेचा आधार घेत गेली तीस वर्षे मुंबई महानगर पालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली, पण गेल्या तीस वर्षात मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे, याला योगायोगच म्हणावा की मराठीचे नशिब ?

  येत्या दहा वर्षात एकही मराठी शाळा राहणार नाही

  सन २०१०-११ मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आणि विद्यार्थी संख्या १,०२,२१४ होती. आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त ३६,११४. मराठी शाळांना सहा-सहा महिने मुख्यध्यापक मिळत नाही. इतकच नाहीतर २०१३ नंतर आवश्यकतेनुसार शिक्षक भरतीही झाली नाही.

  कुसुमाग्रज यांचे वाक्य आठवते

  त्यांनी म्हटले आहे की, आपणास पत्र लिहण्याचे कारण की मला मिळालेल्या माहितीनुसार मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर २०२७-२०२८ सालापर्यंत मराठी माणसाला आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्या मुलांसाठी एकही मराठी शाळा उपलब्ध राहणार नाही. ज्या मायमराठीने गेली ३० वर्ष मुंबई महानगर पालिकेत एकहाती सत्ता शिवसेनेला दिली, त्याच मराठीचे हाल बघून मला कविवर्य कुसुमाग्रज यांचे वाक्य आठवते. मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे.