court

लहान आणि कोवळ्या वयात मुलांना आईच्या सहवासाची गरज असते. त्यांच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी नैसर्गिकरित्या मुलांचा ताबा आईकडे असणेच योग्य असल्याचे निरीक्षण गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आणि टीव्ही अभिनेत्याला मुलाचा ताबा देण्यास खंडपीठाने नकार दिला.

    मुंबई  : लहान आणि कोवळ्या वयात मुलांना आईच्या सहवासाची गरज असते. त्यांच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी नैसर्गिकरित्या मुलांचा ताबा आईकडे असणेच योग्य असल्याचे निरीक्षण गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आणि टीव्ही अभिनेत्याला मुलाचा ताबा देण्यास खंडपीठाने नकार दिला.

    टीव्ही अभिनेता आणि अभिनेत्री असलेल्या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, अभिनेत्याने मुलाचा ताबा आपल्यालाच मिळावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या पत्नीने मुलाला बेकायदेशीरपणे त्याच्यापासून दूर ठेवले असल्याचा दावा करत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी मुलाची काळजी घेण्यासाठी अभिनय क्षेत्र सोडले कारण, त्यांची विभक्त पत्नी व्यावसायिक वचनबद्धतेमुळे तसेच कामातील व्यग्रतेमुळे मुलाच्या गरजा आणि कल्याणाकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे मुलाचा सांभाळ करण्यासाठी वडिलांकडे त्याचा ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्याच्या वकील स्वप्ना कोडे यांनी खंडपीठाकडे केली.

    तर, अभिनेत्रीकडून याचिकेला विरोध करण्यात आला. कोणतेही मूल त्याच्या आईबरोबरच आनंदी राहू शकते आणि या प्रकऱणात मुलाचा ताबा याचिकाकर्त्याकडे सोपवला गेल्यास तर ते मुलाच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरेल, असा युक्तिवादही अभिनेत्रीकडून वकील हृषिकेश मुंदरगी यांनी केला.

    वैवाहिक कलहामुळे या जोडप्यामध्ये तीव्र वैमनस्य निर्माण झाले आहे. मात्र, मुलाच्या संगोपनाचा मापदंड हा सर्वस्वी आई-वडिलांच्या कामाचे स्वरुप आणि वेळेची उपलब्धता यांवर बेतला जाऊ शकत नाही. अभिनेत्री कामात व्यग्र असणं हे ती तिच्या मुलाच्या ताब्यासाठी अयोग्य असल्याचे परिमाण ठरू शकत नाही. तसेच प्रथमदर्शनी असा कोणताही पुरावा आढळलेला नाही, ज्यामुळे मुलाचा ताबा आईकडे असल्यास ते त्यांच्या संगोपनासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकेल, असे स्पष्ट करत खंडपीठाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद स्विकारण्यास नकार दिला. मात्र, मुलाला दोन्ही पालकांच्या प्रेम आणि आपुलकीची गरज आहे, असेही अधोरेखित करत खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दररोज दिवसातून अर्धा तास आणि आठवड्यातून दोनदा भेटण्याची परवानगी दिली.

    या प्रकरणातील मुलाचे वय पाहता त्या वयातील प्रत्येक मुलाला आईकडून मिळणारे प्रेम, माया, काळजी आणि सुरक्षा हे वडील किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीकडून मिळू शकत नाही. कोवळ्या वयात मुलांना आईच्या सहवासाची गरज असते. त्यांच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी नैसर्गिकरित्या मुलांचा ताबा आईकडे असणेच योग्य असते. या प्रकरणात दोन्ही अभिनेते पडद्यावर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सुंदररित्या वठवतात. त्याचप्रमाणे वास्तविक आयुष्यातही ते आपल्या मुलाच्या सर्वोत्तम आणि सर्वांगीण विकासासाठी योग्य ती भूमिका वठवतील, अशी आशा आणि विश्वासही खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केला.