छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईत स्मृती स्तंभ उभारावा, यासाठी शिष्टमंडळाने घेतली आदित्य ठाकरेंची भेट

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे निधन झाले तेथे यावर्षी स्मृती स्तंभ उभारण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. याबाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन वरळी किंवा डिलाईल रोड या परिसरात कोल्हापूर निवासी बांधव मोठ्या प्रमाणावर राहत, असल्यानेही तिथेही एक स्मारक उभारण्याचा मानस असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

    मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे निधन झालेल्या मुंबईतील गिरगावमधील पन्हाळा लॉज राजवाडा येथे स्मृती स्तंभ उभारावा, यासाठी मालोजीराजे शाहू छत्रपती तसेच गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे निधन झाले तेथे यावर्षी स्मृती स्तंभ उभारण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. याबाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन वरळी किंवा डिलाईल रोड या परिसरात कोल्हापूर निवासी बांधव मोठ्या प्रमाणावर राहत, असल्यानेही तिथेही एक स्मारक उभारण्याचा मानस असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

    डिलाईल रोड या विभागाला ‘मिनी कोल्हापूर’ असे म्हटले जाते, कारण या परिसरात कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी मोठ्या प्रमाणात राहतात. तसेच डिलाईल रोड या विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील चाकरमानी जे कामानिमित्त आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी कोल्हापूरहून मुंबईला आले आहेत, असे असंख्य कोल्हापूरकर या विभागात राहतात, त्याचबरोर ग्रामस्थ मंडळाच्या खोल्यातून सुद्धा हजारो कोल्हापूरकर राहत आहेत. त्यामुळं या विभागात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक व्हावी, अशी कोल्हापूरकरांची सुद्धा इच्छा आहे. त्याचबरोबर डिलाईल रोड या विभागात कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळं या परिसरात “कोल्हापूर भवन” सुद्धा असावे अशी सुद्धा मुंबईतल्या कोल्हापूरकरांची तीव्र इच्छाशक्ती आहे.

    या शिष्टमंडळात आमदार सर्वश्री चंद्रकांत जाधव, जयंत आजगावकर यांच्यासह ऍड.गुलाबराव घोरपडे, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, किरण चव्हाण, अनुप चौगुले, प्रताप नाईक, राजेश पाटील आदींचा समावेश होता.