पोलिसांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलीस महासंचालकांनी घेतला मोठा निर्णय; तात्काळ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाच्या लढ्यात पहिल्या फळीवर काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलीस महासंचालकांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयीन उपस्थितीविषयी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाच्या लढ्यात पहिल्या फळीवर काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलीस महासंचालकांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयीन उपस्थितीविषयी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

    पोलीस कार्यालयात ५० टक्के हजेरी तर इतर कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे असे आदेश अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    कार्यालयीन उपस्थितीविषयी सूचनापत्रकच जारी करण्यात आले आहे. गट अ आणि ब श्रेणीतील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या १०० टक्के इतकी राहील. तर, गट क आणि ड श्रेणीतील पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या ५० टक्के राहील. त्यापैकी २५ टक्के कर्मचारी सकाळी ९ ते ४ या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील. तर, उर्वरित २५ टक्के कर्मचारी सकाळी ११ ते ५ या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील. कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहायचे आहे, याबाबतचा निर्णय संबंधित उपसहाय्यक घेतील असे या आदेशात म्हंटले आहे.

    गट क आणि ड श्रेणीतील उर्वरित पोलीस कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करतील. तात्काळ सेवेसाठी फोनवर उपलब्ध असतील. ज्यावेळी कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयात तातडीची आवश्यकता असेल, त्यावेळी तत्कालीन परिस्थितीनुसार संबंधित उपसहाय्यक जास्त कर्मचाऱ्यांना (गट क आणि ड श्रेणी) कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी बोलावू शकतात असे निर्देश या आदेशात देण्यात आलेत.