राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्ती न करणे हा घटनेचा भंग; संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्ती न करणे हा घटनेचा भंग आहे. घटनेने त्यांना अधिकार दिला आहे. एक वर्ष होऊनही आपले राज्यपाल महोदय त्या फाईलकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे १२ सदस्य साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुम्ही आमचा अपमान करत आहात- संजय राऊत

    मुंबई: राज्यात करोनाचे सुरू असताना दुसरीकडे राजकीय कुरघोडी कमी होताना दिसत नाही. अशातच सत्ताधारी विरुद्ध राज्यपाल असा कलगीतुरा रंगताना दिसतो. नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून थेट राज्यपालांनाच जाब विचारल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून देखील राज्यपालांना लक्ष्य केले जात आहे.

    उच्च न्यायालयाने राज्यपालांना विचारणा केल्यानंतर शिवसेनेच्या टीकेला अधिक धार आल्याचे दिसून येत आहे. ‘उच्च न्यायालयाने विचारला तसाच आम्हीही प्रश्न विचारतो आहे. विचारणारे कोण आहेत? लोकनिर्वाचित सरकार, मुख्यमंत्री विचारत आहेत. राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्ती न करणे हा घटनेचा भंग आहे. घटनेने त्यांना अधिकार दिला आहे. एक वर्ष होऊनही आपले राज्यपाल महोदय त्या फाईलकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे १२ सदस्य साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुम्ही आमचा अपमान करत आहात’, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

    ‘१२ सदस्य जर वेळेवर नियुक्त झाले असते, तर आज राज्यात जे करोनाचं संकट आले आहे किंवा तौते चक्रीवादळाचं जे संकट आले, त्यामध्ये आपले १२ आमदार काम करत राहिले असते. आजही करत आहेत. पण राज्यपाल महोदय फार काम करत आहेत. पण आपल्या १२ सदस्यांना नियुक्त करणे हे २ मिनिटांचे काम आहे. तुम्ही किती वेळापर्यंत फाईलवर बसून राहणार, हा प्रश्न जर उच्च न्यायालय विचारत आहे, तर आम्हीही तसा प्रश्न विचारू’ असे ही राऊत यावेळी म्हणाले.