१८ वर्षावरील लसीकरण मोहिमेचा पहिल्याच दिवशी उडाला फज्जा;अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद तर कुठे नागरिकांच्या रांगा

राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्र बंद असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी नोंदणी करूनही नागरिकांना लस मिळत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. कसलीही माहिती न देता ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण आज अचानक बंद केल्याने अनेक जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन परत यावे लागल्याने त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्रही अनेक ठिकाणी दिसून आले आहे.

    मुंबई: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षावरील सर्व तरुणांना मोफत लस देण्याचे सरकारने जाहीर केले. त्यानुसार आजपासून लसीकरणास सुरुवात केली जाणार होती. परंतु राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्र बंद असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी नोंदणी करूनही नागरिकांना लस मिळत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईत जोपर्यंत एसमएमस मिळत नाही, तोपर्यंत लसीकरण केंद्रावर येऊ नका, असे आवाहनच मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकरांनी हात जोडून केले आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकठिकाणी नागरिक सकाळपासून लसीकरण केंद्रावर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले आहे.

    पुण्यातही गोंधळ
    पुण्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी पुण्याला २० हजार लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात फक्त १९ केंद्र सुरू असून २ केंद्र पुण्यात आहेत. त्यामध्ये कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे आजच्या दिवशी लसीकरण केले जाणार आहे. शहरात एकूण ७०० नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र, अनेकांनी नोंदणी केली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम असून नागरिकांनी मोठी गर्दी केली.

    नागपुरात मर्यादित स्तरावर लसीकरण सुरु
    नागपूरमध्ये मर्यादित स्तरावर १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे नाव नोंदवून त्यांना टोकन दिले जात आहे. दुपारी २ वाजेनंतर लसीकरणाला सुरवात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याबरोबरच कसलीही माहिती न देता ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण आज अचानक बंद केल्याने अनेक जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन परत यावे लागल्याने त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्रही अनेक ठिकाणी दिसून आले आहे.