मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर उदयराजेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    मुंबई : राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही आरक्षणाचा कायदा रद्द करत आहोत, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं.

    विनोद वाटील काय म्हणाले ?

    दरम्यान न्यायालयानं दिलेला निकाल दुर्दैवी असल्याची भावना राठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडत असताना अनेक चुका झाल्या, असं पाटील म्हणाले. तसेच मराठा आरक्षण बाबत राज्य सरकार कडून कुणीही कारभारी नव्हता, असे विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर स्पष्ट केले. आरक्षण रद्द झाले असेल तर आता सरकारकडे काय पर्याय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. निवड झालेले विद्यार्थी, शिक्षण प्रवेशाचा प्रश्न आहे. सरकारने विशेषबाब म्हणून विचार करावा. आम्ही संयमानेच हे प्रकरण हाताळू, असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

    उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रीया

    भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सुपर न्युमररी आरक्षण देणं हाच आता एकमवे पर्याय आहे. हा पर्याय सरकार ने तात्काळ लागू करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.