सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हे सरकारचे “खुजेपण” – बाळा नांदगावकर

सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील १० बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती- नांदगावकर

मुंबई: राज्य सरकारने विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याने टीकेची झोड उठली आहे. भाजप नेत्याबरोबरच मनसेच्या बाळा नांदगावकर यांनीही सोशलमीडियावर पोस्ट लिहित महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. नांदगावकरांनी फेसबुकवर ‘ये पब्लिक है ये सब जानती है’ या मथळ्याखाली लिहिले आहे की , ‘सरकार ने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली त्यात राजसाहेब यांचे हि नाव आले. सरकार कोणाचे हि असो वास्तवाचे भान ठेवुन असे निर्णय घ्यायला हवे. राज्यातील जनतेसाठी सतत उपलब्ध असणारा नेता , स्वतःच्या पक्षाचा फायदा नुकसान याचा विचार न करता स्पष्ट भूमिका घेणारा नेता, सामान्य लोकांच्या भल्यासाठी अनेकांशी भिडणारा नेता म्हणून राजसाहेब पूर्ण राज्याला माहीत आहे. साहेबांच्या रोख ठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटी साठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. साहेबांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील १० बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती. सरकार ने जनतेला गृहीत धरू नये, ये पब्लिक है ये सब जानती है,असे म्हटले आहे. या पोस्ट सोबत नांदगावकर यांनी राजा ठाकरेंचे काही फोटोही शेअर केले आहेत.