शेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव

आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. उभय अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले.

    मुंबईत मे महिन्यात आलेल्या तौते वादळात बॉम्बे हाय येथे पी-३६५ तराफ्याला भीषण अपघात झाला असताना शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि.२०) राजभवन येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

    आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. उभय अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले.

    राज्यपालांनी अधिकाऱ्यांच्या शौर्याचे कौतुक करीत नौदलाच्या सर्व जवानांना शाबासकी केली. आयएनएस तलवारचे कमान अधिकारी कॅप्टन पार्थ भट्ट जहाजावर कर्तव्य बजावत असल्याने राज्यपालांना भेटण्यास येऊ शकले नाही.

    दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळं ‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात ‘पापा ३०५’ ही बार्ज समुद्रात बुडाली होती. ही इंधनविहीर ओएनजीसीची होती, तर बार्जचे परिचालक अॅफकॉन्स या कंपनीचे होते. अपघातावेळी २६१ कर्मचारी तेथे कार्यरत होते. त्यातील १८६ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात नौदलाच्या बचावपथकांना यश आलं. मात्र, या दुर्घटनेत ६६ जणांचा मृत्यू झाला तर ९ जणं बेपत्ता आहेत. चक्रीवादळात जलसमाधी घेतलेल्या पी ३०५ या बार्जवरील कामगारांच्या मृत्यूप्रकरणी येलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.