मुंबईतील झोपडपट्टयांमध्येच कोरोनाची जास्त लागण

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झाली असून झोपडपट्टयांमधील कोरोनामुळे दगावणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के असल्याचे आढळून आले आहे.

 झोपडपट्यांमधील मृतांचा आकडाही वाढला 

 
मुंबई : मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झाली असून झोपडपट्टयांमधील कोरोनामुळे दगावणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के असल्याचे आढळून आले आहे. पालिका प्रशासना पुढे कोरोनाला आटोक्यात कसे आणायचे याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच झोपडपट्टयांमध्ये वाढणारे मृत्यूचे प्रमाण रोखण्याची कसरत आरोग्य यंत्रणेला करावी लागत आहे.वरळी, धारावी, गोवंडीच्या झोपडपट्टयांमध्ये कोरोना रुग्ण सापडत असतानाच दोन दिवसांपूर्वी मुलुंडच्या झोपडपट्टीत एका दिवसात ५० रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.मुलुंडमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणावर रुग्ण सापडणे हे धोक्याचे मानले जात आहे.
सोमवारी मुंबईत १९२७ कंटेन्मेंट झोन होते. त्यातील ८० टक्के कंटेन्मेंट झोन हे झोपडपट्टया आणि चाळीत आहेत. पालिकेने गेल्या आठवड्यात केलेल्या एका सर्व्हेनुसार मुंबईतील कोरोनाचे ६० टक्के मृत्यू हे झोपडपट्टया आणि झोपडपट्टी सदृश्य परिसरातील आहेत.यातील ६४१ कंटेन्मेंट झोन हे रेड झोनमधील आहेत. तर ५०२ कंटेन्मेंट झोन हे ऑरेंज झोनमधील आहेत. मात्र, या ऑरेंज झोनमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात असल्याच पालिकेने म्हटले आहे.
 धारावी परिसर सुद्धा रेड झोनमध्ये असून या ठिकाणी सर्वाधिक ६३२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मानखुर्द-शिवाजी नगर हा १०० टक्के परिसर झोपडपट्टीचा आहे. एम पूर्व प्रभागात मोडणाऱ्या या विभागात ४६० कोरोना रुग्ण आढळून आले असून या ठिकाणी आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकट्या मानखुर्द ते शिवाजी नगर परिसरातच ६० टक्के कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
शिवाजी नगर आणि बैंगनवाडी परिसर हा दाटीवाटीचा आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे मोठे आव्हान आहे.  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून येथील गरीब लोक आपल्या लहान खोलीत दिवस काढत आहेत.स्वयंपाक करून खाण्यासाठी तरी भाजीपाला आणण्यासाठी बाहेर जावेच लागते ते पण केले नाहीतर आम्ही उपाशी मरणार काय?असा सवाल नागरिक करत आहेत.