मुंबईतील जम्बो कोविड केंद्रातील आयसीयू विभाग अधिक सक्षम होणार

  • ४० तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्याचा विचार

मुंबई (Mumbai).  मुंबईतल्या जम्बो कोविड केंद्रावर खाजगी हॉस्पीटलमधील नामांकीत डॉक्टरांची नियुक्ती केल्यानंतर पालिका प्रशासन आता अनेक कोविड केंद्रातील अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांचा नियुक्ति करणार आहे. त्यामुळे या केंद्रात तज्ञ डॉक्टर, भूलतज्ञांची नियुक्ती करण्याची प्रक्रीया पालिकेने सुरु केली आहे. या पदासाठी जाहिरात काढण्यात आली असून या पदाला दोन लाख दहा हजारापर्यत मानधन दिले जाणार आहे.

नेस्को,बीकेसी, मुलूंड आणि महालक्ष्मी रेस कोर्स इथल्या जम्बो कोविड केंद्रात एकूण ४० तज्ञ डॉक्टरांची लवकरच नियुक्ती होणार आहे. या पदासाठी इतर राज्यातील डॉक्टरही अर्ज करु शकतात. या चारही कोविड केंद्रात गंभीर रुग्णांवर उपचाराची अत्याधुनिक व्यवस्था आहे. मात्र अतिदक्षता विभागात अजूनही तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. या केंद्रातील मृत्यूदर कमी करणे आणि आयसीयू विभाग अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईत आयसीयू खाटासह सुसज्ज जम्बो केंद्र उभारली गेली आहेत. इतर शहरातील जम्बो कोविड केंद्रातील सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारींच्या तुलनेत या केंद्राबद्दल तक्रारीचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई अलिकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे पालिकेने जम्बो केंद्रात २५० अतिरीक्त आयसीयू खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कोविड केंद्रात खाजगी रुग्णांलयातील मुंबईच्या विविध खाजगी हॉस्पीटलमधील ३० नामांकित डॉक्टर्स आपली सेवा देत आहेत.