हे तर अशोक चव्हाणांच्या नाकर्तेपणाचे फळ; विनायक मेटेंचा घणाघाती आरोप

आतापर्यंत जी वाताहत झालेली आहे आणि अंतिरिम स्थगिती आलेली आहे ती फक्त आघाडी सरकारमुळे आली आहे. हे अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणाचे फळ आहे, असा घणाघात मेटे यांनी महाविकासआघाडी सरकारवर केला.

    मुंबई : सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर आज मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू आहे. मात्र राज्य सरकारची तयारी अजिबात चांगली झाली नाही. सरकारची रणनीती बोगस आणि अत्यंत अव्यवहारी असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे.

    पुणे जिल्ह्यातील दौंड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यसरकारवर टीका केली. आतापर्यंत जी वाताहत झालेली आहे आणि अंतिरिम स्थगिती आलेली आहे ती फक्त आघाडी सरकारमुळे आली आहे. हे अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणाचे फळ आहे, असा घणाघात मेटे यांनी महाविकासआघाडी सरकारवर केला.

    सरकारने याचिकेकर्त्यांची एकत्रित बैठकीही घेतलेली नाही. तर एका बैठकीला स्वत: चव्हाणही उपस्थित नव्हते. त्यांनी सगळं प्रकरण वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबदल न बोललेलंच बरे आहे. चव्हाण यांच्याबद्दल चांगलं बोलण्याच्या बाबतीत काही शब्द नाही, अशी टीका मराठा आरक्षणावरुन मेटे यांनी केली.

    मराठा आरक्षणावर 18 मार्चपर्यंत घटनापीठापुढे ही सुनावणी चालणार आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष सुनावणी शक्य नसल्यास व्हिडीओ सुनावणी घेऊन यावर निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचेच या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.