आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला; सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना  

मुंबई : माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सवरा यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

विष्णू सवरा यांनी  कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तळागाळातील सामान्य माणसांकरीता ते आयुष्यभर झटले.  विधानसभेत आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी बुलंद होणारा त्यांचा आवाज त्यांचा सहकारी म्हणून मी जवळून अनुभवला आहे.

आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आदिवासी समाजात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी  कायम परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीची तसेच एकूणच राजकिय व सामाजिक क्षेत्राची  मोठी हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.