अधिवेशनातील रणनितीबाबत महाविकास आघाडीत खलबते सुरू; निर्णय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत : सूत्रांची माहिती

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर या सत्रात पुरवणी मागण्यांमध्ये भरिव तरतूद करण्यात येत असून छत्रपती संभाजीराजे यांना आश्वासित केलेल्या मुद्यांवर आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता आहे असे या सूत्रांनी सांगितले.

    मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनात चर्चेला येणाऱ्या महत्वाच्या विधेयकांबाबत तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत रणऩिती ठरविण्यात चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा आणि पूर्वतयारीबाबत विचार विनीमय झाला असून अंतिम निर्णय येत्या रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

    मराठा आणि ओबीसी समाजासाठी भरिव तरतूद
    आज झालेल्या बैठकीत या सत्रातील कामकाजात ठरलेल्या विनीयोजन विधेयकात समावेश करण्याच्या मुद्यांसह अन्य महत्वाच्या मुद्यांवरही चर्चा झाली. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर या सत्रात पुरवणी मागण्यांमध्ये भरिव तरतूद करण्यात येत असून छत्रपती संभाजीराजे यांना आश्वासित केलेल्या मुद्यांवर आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता आहे असे या सूत्रांनी सांगितले. या शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्याच्या उपाय योजनांवर करायच्या आवश्यक खर्चाबाबत पुरवणी नियोजन केले जाणार आहे. याबाबत येत्या रविवारी अधिवेशनात नेमके किती सदस्य उपस्थित राहू शकतील याची चाचपणी झाल्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधीपक्षांसोबत चर्चा करून अध्यक्षीय निवडीच्या कार्यक्रमाचा आराखडा ठरविला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती या सूत्रांनी दिली.

    विरोधकांना आक्रमकपणे उत्तर देण्याबाबत रणनिती
    येत्या काही दिवसांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभुमीवर काय प्रगती होते त्याचा देखील रविवारच्या बैठकीत आढावा घेतला जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई करण्याबाबत भाजपने दबावतंत्र वापरण्यास सुरूवात केल्याने या सत्रात विरोधकांना आक्रमकपणे उत्तर देण्याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करत रणनिती ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.