कर्जत-सीएसएमटी लोकलमध्ये महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या नराधमाला अखेर आठ वर्षांनंतर शिक्षा झाली

मुंबई : कर्जत-सीएसएमटी लोकलमध्ये महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या नराधमाला अखेर आठ वर्षांनंतर शिक्षा झाली आहे. या व्यक्तीला मुंबईच्या दंडाधिकारी कोर्टाने मंगळवारी दोषी ठरवले असून त्याला दोन वर्षांच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

कैलास पहाडी (वय ३०) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन वर्षांचा कडक तुरुंगवास आणि १०,००० रुपयांचा दंड ठोठावला. यांपैकी ८,००० रुपये पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

पहाडीने केलेल्या कृत्याचा पीडित महिलेच्या मनावर मोठा परिणाम झाला. यामुळे तिने आपला आत्मविश्वास गमावला असे निरीक्षणही कोर्टाने यावेळी नोंदवले.

घटना घडली तेव्हा पीडित महिला डोंबिवली येथे रहायला होती. सीएसएमटी येथे ती एका खासगी कंपनीत कामाला होती. १५ फेब्रुवारी २०१२ रोजी कर्जत ते सीएसएमटी लोकलमधू प्रवास करत असताना दोषी पहाडीने तिला पाठीमागून मिठी मारली असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळलेल्या महिलेने त्याला पाहिले आणि या कृत्याबाबत त्याला जाब विचारला. मात्र, तो त्याचक्षणी महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून लगेच शेजारच्या जनरल डब्यात शिरला.

या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या पीडितेने आपल्या महिला सहप्रवाशांना याबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांनी कांजुरमार्गला पोहोचल्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या हेल्पलाइनवर फोन करुन पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला डोंबिवली स्थानकातून ताब्यात घेतले.आरपीएफच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यानंतर पहाडीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आठ वर्षे हा खटला चालला यामध्ये कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. यामध्ये पीडित महिलेने स्वतः आणि तिच्या सहकारी प्रवाशांनी पहाडीला गैरवर्तन करताना पाहिल्याचे सिद्ध झाल्याने तो यामध्ये दोषी ठरला. त्यानंतर कोर्टाने त्याला दोन वर्षांच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.