ओबीसींचे मसीहा तोंडघशी पडले; भाजपच्या नेत्यांना ‘सळो की पळो’ करणार : मोहिनी अणावकर यांचा इशारा 

ओबीसींचे (OBC) मसीहा आम्हीच आहोत असे ओरडून सांगणारे भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्र सरकारने (the Center Government) काल संसदेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची कोणतीही योजना नाही, असे सांगितल्याने तोंडावर आपटले आहेत.

    मुंबई (Mumbai). ओबीसींचे (OBC) मसीहा आम्हीच आहोत असे ओरडून सांगणारे भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्र सरकारने (the Center Government) काल संसदेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची कोणतीही योजना नाही, असे सांगितल्याने तोंडावर आपटले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या या ढोंगीपणाचा चेहरा आता उघड झाला आहे. या नेत्यांना महाराष्ट्रात ‘सळो की पळो’ करुन सोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी अणावकर यांनी दिला आहे.

    ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळले
    केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देतांना ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही, असे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या उत्तराने ओबीसी समाजाच्या जखमेवर मीठ चोळले असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा ढोंगी आणि खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडला आहे, असे मोहिनी अणावकर म्हणाल्या.

    ओबीसीच्या तोंडाला पाने पुसली
    दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसींची परिषद घेण्यात आली. या परिषदेत आम्ही ओबीसींना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले. केंद्रातील त्यांच्याच सरकारने ओबीसी समाजाच्या तोंडाला पाने पुसणारे निवेदन संसदेत करुन या नेत्यांना तोंडघशी पाडले आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत, मोदींच्या मंत्रिमंडळात सत्तावीस ओबीसी मंत्री आहेत, अशा शब्दांत भाजप वाले छाती बडवितात. पण मोदींपासून या सत्तावीस परिवाराच्या समोर पंचपक्वान्नाचे ताट आहे मात्र संपूर्ण समाज हा उपाशीपोटी, अर्धपोटी फिरतोय, यांची पोटाची खळगी कोण भरणार ? असा सवाल मोहिनी अणावकर यांनी केला आहे.

    मुंडेच्या भूमिकेकडे लक्ष
    जोपर्यंत ओबीसी समाजातील उपाशीपोटी, अर्धपोटी जनतेला न्याय मिळवून देण्यात येत नाही तोपर्यंत या तथाकथित मसीहा समजणाऱ्या नेत्यांना सुखाने रस्त्यावर फिरु देणार नाही, अशी प्रतिक्रिया मोहिनी अणावकर यांनी व्यक्त केली आहे. माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे या आता काय भूमिका घेतात, याकडेही समाजाचे लक्ष लागले आहे, असेही मोहिनी अणावकर यांनी सांगितले.