प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आईच्या उदरात एक ऐवजी 2 ते 3 गर्भ असल्याची बातमी आपण नेहमीच वाचतो; पण 18 महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक अविकसित गर्भ असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी येथील डाॅ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्रात आढळून आला आहे.

  मुंबई (Mumbai).  आईच्या उदरात एक ऐवजी 2 ते 3 गर्भ असल्याची बातमी आपण नेहमीच वाचतो; पण 18 महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक अविकसित गर्भ असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी येथील डाॅ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्रात आढळून आला आहे.

  या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘फिट्स इन फिटू’ (fetus in fetu) असं म्हटलं जातं. यामध्ये बाळाच्या तपासण्या करून हा अविकसित मृत गर्भ काढण्याचे आव्हान डॉक्टरासमोर होतं. पण, अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो वजनाचा मृत गर्भ काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

  काय आहे हा प्रकार?
  नेपाळमधील रहिवाशी असलेल्या एका महिलेची अठरा महिन्यांपूर्वी प्रसूती झाली होती. महिलेनं मुलाला जन्म दिला. मात्र, बाळाची दिवसेंदिवस आरोग्याची तक्रार वाढत होती. तसेच बाळाचं पोट वाढत होतं. त्याच्या उपचारासाठी बाळाच्या आईवडिलांनी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉ. शैलजा माने यांच्याकडे प्राथमिक तपासणी केली.

  धक्कादायक बाब म्हणजे आईच्या पोटात दोन गर्भ तयार झाले. त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. पुढे जन्मानंतरही बाळाच्या शरीरात हे गर्भ वाढत होतं. त्यामुळे बाळाला योग्य व पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. पुढे जाऊन इतर अवयवांवर ही गंभीर परिणाम झाला असता, त्यासाठी ही गाठ शरीराबाहेर काढणे महत्वाचे होते.

  पाच लाख बालकांमध्ये एखादी अशी दुर्मिळ घटना पुढे येते. जगभरातील आकडेवारीनुसार २०० अशी प्रकरणे आजपर्यत नोंदवली गेली आहेत. हा मृत गर्भ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते. याची कल्पना रुग्णांच्या नातेवाईकांना दिली होती.

  रुग्णाची सोनोग्राफी व सीटी स्कॅन केल्यानंतर ते गर्भ बाळाच्या यकृत व उजव्याबाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध होते. मोठ्या रक्त वाहिन्यांना चिकटलेला असल्याचे दिसून आलं. हा गर्भ अविकसित असून, तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झालं. बाळाच्या सर्व आरोग्य तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 6 तास ही शस्त्रक्रिया चालली.