पालिकेचे आता “वॉर्ड वॉर रूम”

-सोमवार पासून कार्यान्वयित मुंबई :कोव्हीड रुग्णांना खाटा व उपचार मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे आता कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी त्यांना सहज बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध व्हावेत

-सोमवार पासून कार्यान्वयित


मुंबई : कोव्हीड रुग्णांना खाटा व उपचार मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे आता कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी  त्यांना सहज बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध व्हावेत यासाठी वार्ड स्तरावर विशेष वॉर रूम तयार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या मुख्यालयात असलेल्या मुख्य कोरोना नियंत्रण कक्षाचे विकेंद्रीकरण करून वार्ड स्तरावरील आपात्कालीन नियंत्रण कक्षाचे ‘वार्ड वॉर रूम’मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. हे वॉर्ड स्तरावरील रूम सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे.  

कोव्हीड रुग्णांना १९१६ वर कॉल केल्यानंतर सेवा मिळण्यास तसेच हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यास विलंब होतो किंवा बऱ्याचदा कोणतीच सेवा मिळतात नाही. त्यामुळे पालिकेने आता मुख्य कोरोना नियंत्रण कक्षावरील भार कमी करण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांना तातडीने बेड उपल्बध व्हावेत यासाठी सहायक आयुक्तांच्या अधिपत्याखाली प्रत्येक वॉर्डमध्ये २४ तास वॉर रूम सुरु करण्याचा निर्णय घेतलं आहे. पालिकेच्या साथ रोग नियंत्रण कक्षाला प्रयोगशाळांकडून सकाळी ८ वाजता कोव्हीड रुग्णांची यादी मिळाल्यानंतर ती वार्डनिहाय वेगळी करून प्रत्येक वॉर्डाच्या सहायक आयुक्तांना ऑनलाईन पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर वॉर्ड वॉर रूममधील डॉक्टर तातडीने लक्षणविरहित आणि मध्यम लक्षणे असलेल्यांशी संवाद साधून त्यांना घरातच किंवा संस्थात्मक विलगीकरण होण्याच्या सूचना देतील. तर संसर्गित व्यक्तीच्या घरी तातडीने आरोग्यसेविकांना पाठवून रुग्णाची प्लस ऑक्सिमीटर किंवा थर्मल गनच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. आरोग्यसेविकांनी आपला अहवाल पाठवल्यानंतर लगेचच वॉर रूममधून पालिका, राज्य सरकारच्या, खासगी किंवा जम्बो सुविधा केंद्रांमध्ये सर्वसाधारण बेड, ऑक्सिजनरेट बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटरसह आयसीयू बेड उपलब्ध आहेत याची माहिती रुग्णाला आरोग्यसेविकांच्या माध्यामातून देण्यात येणार आहे. यामध्ये ३३ खासगी हॉस्पिटलचाही समावेश असणार आहे. परंतु कोठेच खाटा उपलब्ध नसतील तर वॉर रूमकडून तातडीने मुख्य कोरोना नियंत्रण कक्षाला कळवण्यात येईल. त्यानुसार मुख्य नियंत्रण कक्षावर बेड उपल्बध करून देण्याची जबाबादारी असणार आहे. रुग्णाला बेड उपलब्ध झाल्यानंतरच आरोग्यसेविका रुग्णाच्या घरातून बाहेर पडणार आहे. 

रुग्णवहिकांची समस्या सुटणार

कोव्हीडच्या रुग्णांना रुग्णवाहिका मिळण्यात अनेक अडचणी येतात. वारंवार कॉल करूनही रुग्णवाहिका मिळत नसल्याने वॉर्डनिहाय सुरु करण्यात आलेल्या प्रत्येक वॉर्ड वॉर रूमला ८ सर्वसाधारण रुग्णवाहिका तर दोन १०८ रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. यावर प्रत्येक वार्डच्या सहायक आयुक्ताचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे यापुढे रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

कसे असेल वॉर्ड वॉर रूम 

प्रत्येक वॉर रूम तीन शिफ्टमध्ये चालणार आहे. वॉर रूममध्ये ३० दूरध्वनी लाईनसह डॉक्टर, शिक्षक उपलब्ध असणार आहेत. पहिली शिफ्ट सकाळी ८ ते दुपारी ४ असणार आहे. यावेळी १० जणांच्या वैद्यकीय टीममध्ये दोन डॉक्टर, ४ शिक्षक, इंजिनियर स्टाफ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये पाच जणांची टीम असून त्यामध्ये १ डॉक्टर, ३ शिक्षक, आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणार आहे. तसेच प्रत्येक शिफ्टमध्ये उत्कृष्ट मराठी येणारे पाच टेलिफोन ऑपरेटर असणार आहेत. वॉर रूममधील प्रत्येक कृतीवर वरिष्ठ डॉक्टरांचे लक्ष असणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून (डीएमईआर) हे वरिष्ठ निवासी डॉक्टर पुरवण्यात येणार आहेत. वॉर रूममध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या डॉक्टरांना डीएमईआर आणि नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.