The NCP is vying for the chairmanship of the Women's Commission; Vidya Chavan's Rupali Chakankar? Decision in two days!

    मुंबई : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, यांच्या सह माजी अध्यक्षा विद्या चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने साकीनाका निर्भया प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाचे लवकरात लवकर गठन करण्याबाबत राज्य सरकारचे कान टोचले आहेत.

    राष्ट्रवादीच्या वाट्याला महिला आयोग

    नव्या महिला आयोग अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. कारण महिला आणि बालकल्याण खाते काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला महिला आयोग यावा अशी अपेक्षा केली जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,यांच्या सह माजी अध्यक्षा विद्या चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत.

    चव्हाण की चाकणकर निर्णय दोन दिवसांत!

    रुपाली चाकणकर आणि विद्या चव्हाण या दोघीना महिलांच्या प्रश्नाची चांगली जाण असून त्या वेळोवेळी आवाज उठवत असतात. मात्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद रुपाली चाकणकर यांच्याकडे असल्याने त्यांना अन्य महत्वाची जबाबदारी देता येईल का याबाबत पक्षातच दोन मते आहेत. कारण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत.

    तर, रूपाली चाकणकर यांच्या ऐवजी मुंबईतील विद्या चव्हाण यांच्या नावाचा विचार केला जात आहे कारण साकीनाका घटनेनंतर येत्या महापालिका निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून मुंबईत विरोधकांकडून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. त्यामुळे मुंबईतील राष्ट्रवादीच्या महिला नेत्याकडे ही जबाबदारी देण्याबाबत विचार केला जात आहे असे सांगण्यात आले. याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय अपेक्षीत असल्याचे सांगण्यात येत आहे.