केंद्रीय मंत्रिमंडळातील नवीन मंत्री म्हणजे ‘लाटेबरोबर वाहून किनाऱ्याला लागलेले ओंडकेच’ ; सामानाच्या अग्रलेखातून घेतला खरपूस समाचार

कोसळलेली अर्थव्यवस्था, कोरोना महामारीने निर्माण केलेले आरोग्यविषयक अराजक, शिक्षणातील गोंधळ, महागाई, बेरोजगारीची खडखड यावर ‘उतारा’ म्हणून पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसून आपल्याच टेबलावर ठेवले आहेत.

    मुंबई: पंतप्रधान मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात समावेश बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱ्याला लागलेले ओंडकेच आहेत, असं म्हणत देशातील नव्या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातील राणे, कपील पाटील, भारती पवार यांच्याही पक्षबदलाचा इतिहास सांगत सामानाच्या अग्रलेखातून( Saamana Editorial)नवीन मंत्रिमंडळावर निशाणा साधला आहे.

    कोसळलेली अर्थव्यवस्था, कोरोना महामारीने निर्माण केलेले आरोग्यविषयक अराजक, शिक्षणातील गोंधळ, महागाई, बेरोजगारीची खडखड यावर ‘उतारा’ म्हणून पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसून आपल्याच टेबलावर ठेवले आहेत. या मंत्रिमंडळ फेरबदलाचे वैशिष्ट्य काय? तर वाजपेयी काळातील एक राजनाथ सिंग व मुख्तार अब्बास नकवी हे दोन सोडले तर बाकी सर्व पत्ते नवेच आहेत.

    मंत्रिमंडळ विस्तारास ‘मेगा सर्जरी’ची उपमा दिली आहे. ही खरोखरच सर्जरी असती तर अर्थमंत्री व विदेश मंत्र्यांना सगळ्याच आधी घरी पाठवले गेले असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा, परराष्ट्र व्यवहार नीतीचा आज जो बोजवारा उडाला आहे तो तसा याआधी कधीच उडाला नव्हता, पण पंतप्रधानांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला व त्यांच्या जागी गुजरातचे मनसुख मांडवीय यांची नेमणूक केली. हर्षवर्धन यांच्या काळात महामारीचा उद्रेक झाला व लोकांच्या प्रेतांचे खच पडले हे खरे, पण याबाबतीत मेणबत्त्या पेटवून, थाळय़ा वाजवून कोरोना पळवा असे सांगण्यापर्यंतचे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले नव्हते. मनसुख मांडवीय हे तरुण व अधिक कार्यक्षम आहेत. आधीच्या जहाज बांधणी मंत्रालयात त्यांचे काम चांगले होते.

    ज्येष्ठ मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांना वगळणे हा धक्काच आहे. त्या दोघांनाही धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो इतकीच प्रार्थना आपण करू शकतो. आधीच्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांना इतके महत्त्वाचे खाते जेव्हा दिले तेव्हाच संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने आवंढा गिळला होता. जे खाते पी. व्ही. नरसिंह राव, अर्जुन सिंग, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या तज्ञांनी सांभाळले होते, ते पोखरीयाल यांना देताना भान ठेवायला हवे होते. अशी टीकाही त्यांनी केली आहे.