बेस्टमधील कोरोनाबधितांचा आकडा १३ वर तर एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था पाहणाऱ्या बेस्ट मधील 5 कर्मचारी सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे बेस्टमधील

मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था पाहणाऱ्या बेस्ट मधील 5 कर्मचारी  सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे बेस्टमधील कोरोनाबधितांचा आकडा १३ वर पोहचला आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे. 

देवनार डेपोमधील ड्रायव्हर, कुलाबा, सांताक्रूझ आणि विक्रोळी डेपोमधील कंडक्टर तसेच दादर डेपोमधील मेंटेनन्स विभागाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. देवनार डेपोमधील ५१ वर्षीय ड्रायव्हरला जास्त कॉलेस्ट्रोल, हायपरटेन्शनचे आजार असून तो नवी मुंबई कामोठे येथे राहणारा आहे. त्याच्या घरातील ४ जणांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. या ड्रायव्हरबरोबर काम करणारा व कोपरखैनारे येथे राहणारा कंडक्टरही पॉझिटिव्ह आला आहे. 

बेस्टमध्ये नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित 3 कर्मचाऱ्यांच्या पत्नीनाही कोरोनाची लागण झाल्याने बेस्टच्या परेल डेपोमधील ते राहत असलेली इमारत सिल करण्यात आली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार वाढल्याने ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे, ज्यांचे वय जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना कामातून सूट देण्यात आली आहे. 

एका कर्मचाऱ्याचा मृत्यू  

बेस्ट उपक्रमाच्या वडाळा डेपोमध्ये फॉरमनचे काम करणारा कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. त्याचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. बेस्टमधील या कर्मचाऱ्याला सर्वात आधी कोरोनाची लागण झाली होती.