लस घेतल्यानंतर दीड तासात झाला व्यक्तीचा मृत्यू; लसीकरणानंतर झालेल्या मृत्यूची चिकित्सा होणार 

    मुंबई : एका लसीकरण केंद्रात कोरोना लसीकरणानंतर सोमवारी एका ६५ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. मुंबईत लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. सदर व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या घटनेची चिकित्सा केली जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय समितीची बैठक होणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

    मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत ३ लाख ९० हजार ३८ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत एकालाही गंभीर साईडइफेक्ट झाल्याचे समोर आले नव्हते. मात्र सोमवारी एका खासगी रुग्णालयात लसीकरणानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

    लसीची मात्रा दिल्यानंतर ते बेशुध्द झाले. यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक असलेले औषधोपचार करुन त्याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. सदर व्यक्तीच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.