राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, बळीराजा सुखावला

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसानं कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे.

  मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसानं कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे.

  दरम्यान या पावसामुळं शेतकरी राजा काहीसा सुखावला आहे. राज्यातील काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची रिप रिप सतत सुरु आहे. अद्याप पाणी साचल्याचं कुठेही समोर आलेलं नाही.  अंधेरी, बांद्रा, दादर आणि दक्षिण मुंबईत सततधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, पनवेल परिसरात देखील सततधार पाऊस सुरु आहे. तसेचं पुण्यात सकाळपासून हलका पाऊस सुरु आहे. पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. वसई विरारमध्ये रात्रभर पावसाची संततधार होती. सलग तिसऱ्या दिवशी ही वसई विरार शहरात पावसाची रिप रिप सुरु आहे. आज ढगाळ वातावरण आहे. अजून तरी शहरातील सखल भागात पाणी साचलेलं नाही.

  • सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण, पाऊस नाही.
  • नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे.
  • नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे
  • रायगड जिल्ह्यात अनेक भागात ढगाळ वातावरण, रात्रीच्या सुमारास काही भागात पावसाची हजेरी, सकाळपासून पाऊस नाही.
  • धुळे जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली असून ढगाळ वातावरण कायम आहे
  • चंद्रपूर : वातावरण ढगाळ आहे पण पाऊस नाही

  बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून संततधार सुरू असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे , जिल्ह्यातील मेहकर , लोणार , संग्रामपूर ,शेगाव , खामगाव तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक सखल भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यातील अनेक प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 64 टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त मेहकर तालुक्यात सरासरीच्या 110 टक्के पाऊस बरसला आहे.