कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची क्वालिटी निकृष्ट दर्जाची; बनावट साठ्यांमुळे चिंता वाढली

राज्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये गंभीर रुग्णांची संख्या अधिक होती. या रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वरदान ठरत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनला मागील काही महिन्यात प्रचंड मागणी होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता. हा काळाबाजार रोखण्यासाठी एफडीएकडून राबवलेल्या मोहीमेंतर्गत जून व जुलै या दोन महिन्यांत राज्यातील विविध भागातील बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनचे तब्बल ११ साठे जप्त करण्यात आले आहेत.

  मुंबई : कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचा साठा बाजारात उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने दोन महिन्यात केलेल्या कारवाईतून दिसून आले आहे. दोन महिन्यांमध्ये एफडीएने राज्यभरातून रेमडेसिवीर इंजेक्शनचे तब्बल ११ निकृष्ट दर्जाचे साठे जप्त केले आहेत. या इंजेक्शनच्या पॅकिंगवर नामांकित कंपन्यांच्या नावाचा उल्लेख असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण हाेत आहे.

  राज्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये गंभीर रुग्णांची संख्या अधिक होती. या रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वरदान ठरत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनला मागील काही महिन्यात प्रचंड मागणी होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता. हा काळाबाजार रोखण्यासाठी एफडीएकडून राबवलेल्या मोहीमेंतर्गत जून व जुलै या दोन महिन्यांत राज्यातील विविध भागातील बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनचे तब्बल ११ साठे जप्त करण्यात आले आहेत.

  जप्त करण्यात आलेल्या साठ्यांमध्ये तीन साठे हे जूनमध्ये तर आठ साठे हे जुलैमध्ये जप्त केले आहेत. जप्त साठ्यामध्ये सिप्ला, कॅडिला हेल्थ केअर लिमिटेड, हेटेरो लॅब लिमिटेड, ज्युबिलियंट जेनेरिक लिमिटेड, मायलॅन लॅबोरेटरीज, अस्पारो फार्मा लिमिटेड या सारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाचे लेबलचा वापर इंजेक्शन विक्रीसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल हाेत आहे.

  अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बनावट इंजेक्शन बनवणारे राजराेसपणे फिरत आहेत. दोन महिन्यांत बनावट इंजेक्शनचे ११ साठे जप्त होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणात अनेक व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणांच्या सखोल चौकशीची मागणी ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केली.

  हे साठे ज्यांच्याकडे लायसन्स नाही अशा व्यक्तींकडून जप्त केले आहेत. त्यांनी नामांकित कंपन्यांच्या इंजेक्शनचे वायल्स, कार्टन अशा विविध वस्तू जमा करून विक्री केली. त्यामुळे बनावट इंजेक्शन बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल केला आहे. त्यांनी मुख्य उत्पादक कंपनीचे नाव वापरले असले तरी हे इंजेक्शन त्यांनी बनवले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. बनावट इंजेक्शन बनवणाऱ्यांवर आमचे लक्ष आहे.

  - डी. आर. गहाणे, सहआयुक्त (औषध), अन्न व औषध प्रशासन