भांडण माझ आणि फडणवीसांचे पण… महादेव जानकर यांचा राजकीय गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.  जानकर भाजपाच्या नेतृत्वाखालील युतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चाही रंगली आहे. जानकर यांनी याचे खंडण करत एक मोठा राजकीय गौप्यस्फोट  केला आहे.

बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान महादेव जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा राजकीय गौप्यस्फोट  केला. “माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण, त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचेही जानकर यांनी सपष्ट केले.

महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जानकर भाजपाची साथ सोडणार असल्याची चर्चा जोरात सुरु होती.

जानकर यांनी स्वतः या भेटीबाबात भाष्य करत आरोप फेटाळून लावले आहेत. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असं जानकरांनी स्पष्ट केलं होतं. “भाजपावर आपण नाराज असलो, तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं,” असं जानकर म्हणाले.

जानकरांना डावलून भाजपानं गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्यानं जानकर नाराज असल्याचीही चर्चा आहे.