पावसामुळे रुग्णालयांच्या ओपीडीतील रुग्णसंख्या घटली, बाह्यरुग्ण विभागामध्ये फक्त १५० रुग्णांची नोंद

सायन रुग्णालयांमध्ये दररोज ६५०० रुग्ण उपचारासाठी येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ३५०० रुग्ण येत आहेत. मात्र पावसामुळे बुधवारी बाह्यरुग्ण विभागामध्ये फक्त १५० रुग्णांची नोंद झाली. तसेच अनेक शस्त्रक्रियाही रद्द कराव्या लागल्या आहेत. सध्या सायन रुग्णालयात दररोज १५० शस्त्रक्रिया होत आहेत मात्र पावसामुळे फक्त अतिमहत्त्वाच्या १५ शास्त्रक्रियाच झाल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. 

  मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम बुधवारी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दिसून आला. मुंबईतील जे. जे. रुग्णालय, केईएम, नायर, सायन आणि राजावाडी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णच न आल्याने फारच कमी गर्दी होती. पावसामुळे रुग्ण जरी कमी आले तरी शास्त्रक्रियेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  नायर रुग्णालयांमध्ये साधारणपणे दररोज दीड ते दोन हजार रुग्ण रोज उपचारासाठी येत असतात. सध्या असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ६०० ते ७०० रुग्णच बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येत आहेत. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे फक्त ३००रुग्णच उपचारासाठी आल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

  त्याचप्रमाणे सायन रुग्णालयांमध्ये दररोज ६५०० रुग्ण उपचारासाठी येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ३५०० रुग्ण येत आहेत. मात्र पावसामुळे बुधवारी बाह्यरुग्ण विभागामध्ये फक्त १५० रुग्णांची नोंद झाली. तसेच अनेक शस्त्रक्रियाही रद्द कराव्या लागल्या आहेत. सध्या सायन रुग्णालयात दररोज १५० शस्त्रक्रिया होत आहेत मात्र पावसामुळे फक्त अतिमहत्त्वाच्या १५ शास्त्रक्रियाच झाल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

  पावसामुळे बंद पडलेली लोकल आणि वाहतूक कोंडी यामुळे अनेक कर्मचारी कामावर येऊ न शकल्याने हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना दोन पाळ्यामध्ये काम करावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.  जे. जे. रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येवर पावसाचा परिणाम झाला. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया रद्द केली नसल्याचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी सांगितले.

  त्याचप्रमाणे राजावाडी रुग्णालयातही निम्म्यापेक्षा कमी रुग्ण आले. कोविडमुळे सध्या २००० हजार रुग्ण बाह्य रुग्ण विभागात येत असताना बुधवारी फक्त ८०० ते १००० रुग्ण आले. मात्र लसीकरण प्रक्रिया व्यवस्थित पार पडली असून १८० जणांना लस देण्यात आल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

  नायरमधील बत्ती गुल

  सकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसांने सकाळी ६ वाजता नायर रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र रुग्णालय प्रशासनाने जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत ठेवल्याने रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. अखेर दुपारी १२वाजता वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला.