शिक्षकांच्या उपस्थितीचे मुख्याध्यापकांना अधिकार

शिक्षण विभागाकडून लवकरच निर्णय जारी करणार मुंबई :रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत येणार्‍या तक्रारींची दखल घेत शिक्षकांना शाळेत येण्याबाबत

शिक्षण विभागाकडून लवकरच निर्णय जारी करणार 


मुंबई : रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत येणार्‍या तक्रारींची दखल घेत शिक्षकांना शाळेत येण्याबाबत सर्वाधिकार मुख्याध्यापकांना दिले जाणार आहे. यासंदर्भातील निर्णय लवकरच जारी केला जाणार आहे.

‘शाळेत उपस्थित रहा, अन्यथा वेतन कपात केली जाईल’ असा इशारा देत शिक्षकांना शाळेत बोलवले जात आहे. तसेच मुंबईतील काही शाळांचे रुपांतर विलगीकरण केंद्रात (क्वारंटाईन सेंटर) करण्यात आल्याने शिक्षकांना शाळेबाहेर उभे राहून दिवस भरावा लागत आहे. 

१५ जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात करत विद्यार्थ्यांना पुस्तके व धान्य वाटप करण्यासाठी शाळांमध्ये सर्व मुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. मात्र अनेक शिक्षक हे गावी गेले आहेत, काही शिक्षक हे पन्नाशी ओलांडलेले तर काहींना अनेक व्याधी आहेत. तर काही अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा असे लांब राहत आहेत. त्यामुळे त्यांना शाळेत येणे शक्य नाही. तसेच कोरोनाच्या काळात शाळेत येणार्‍या शिक्षकांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेण्यात येत नसल्यासंदर्भातील अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत. या तक्रारींची शिक्षण विभागाने दखल घेत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला. आहे. 

या प्रस्तावानुसार शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यायचा आहे. तसेच आवश्यकता नसल्यास शिक्षकांना शाळेत बोलावले जाऊ नये. त्याचप्रमाणे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करू नये, अशा सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश आता लवकरच राज्यातील शाळांना दिले जातील अशी माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.