‘या’ ठिकाणी खुलेआम होतेय ‘चायनीज’ मांज्याची विक्री; पोलिसांकडून साध्या मांजाचा वापर करण्याचे आवाहन

राज्यशासनाने चायनीज मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र शासनाचा हा नियम धुडकावून लावत नालासोपारा परिसरात खुलेआम चायनीज मांज्याची विक्री केली जात आहे. बाजारात विक्री असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मांज्याबरोबर चायनीज मांजाची विक्रीछुप्प्या पद्धतीने केली जात आहे.

मुंबई: जानेवारी महिना सुरू होताच मकर संक्रातीच्या सणाबरोबर वेध लागता ते पंगत उडवण्याचे, आकाशातही अनेक पतंग उडताना दिसतात. परंतु पतंग उडवत असताना वापरल्या जाणाऱ्या चायनीज मांज्यामुळे अनेक पक्षी जखमी होतात, मृत्यूमुखी पडतात. अनेकदा नागरिकांही या मांज्याचे बळी ठरतात. यासाठी उपायोजना करत राज्यशासनाने चायनीज मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र शासनाचा हा नियम धुडकावून लावत नालासोपारा परिसरात खुलेआम चायनीज मांज्याची विक्री केली जात आहे.
बाजारात विक्री असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मांज्याबरोबर चायनीज मांजाची विक्रीछुप्प्या पद्धतीने केली जात आहे. नागरिकांनी पंतग उडवताना साध्या मांजाचा वापर करावा, चायनीज मांज्याचा कुणीही वापर करू नये असे आवाहन पोलिसांनी  केले आहे.

संक्रांतीच्या काळात करुणा ट्रस्ट यांच्या वतीने मुंबई आणि वसईत या मांज्यामुळे पक्षी आणि प्राण्यांच्या उपचारासाठी दरवर्षी शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये उपचार केलेल्या पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येवरून ही आकडेवारी काढण्यात येते. या ट्रस्टचे प्राणीमित्र मितेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मागील दोन दिवसांत ७ ते ८ पक्षी आणि १० प्राणी मांज्याचे शिकार झाले आहेत. यात मांज्याने गळा आणि पंख कापले गेल्याने दोन कबुतरांना आपला जीव गमवावा लागला आहे.  गेल्या वर्षी १०८ पक्षी या मांज्याची शिकार झाले होते. त्यात ३५ पक्षी आणि एका कुत्र्याचा जीव गेला होता. चायनीज, नायलॉनचा मांजा हा पक्षी प्राणी तथा मानवालासुद्धा घातक आहे, यामुळे या मांज्याचा वापर करणे टाळावे, असे आवाहन जैन यांनी केले.

या संदर्भात अधिक माहिती घेतली जाईल, तसेच सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या जातील. लवकरच अशा मांज्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. अशी माहिती संजयकुमार पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, वसई झोन २ यांनी दिली आहे.