सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकावर टीका केली होती. या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गेली दीड वर्ष मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात. ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.

    मुंबई : राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकावर टीका केली होती. या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

    नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?

    सर्वोच्च ज्ञानी आणि सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो. हे आपल्याला कितपत व कसं समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. तसेचं गेली दीड वर्ष मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात. ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.

    राऊत काय म्हणाले होते?

    दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क सुरक्षा यंत्रणांनी लोकांना उतरवायला सांगितले. दुसरीकडे अमित शहा यांच्या एका दौऱ्यात सुरक्षा यंत्रणांनी लोकांना घरांच्या दारे, खिडक्या बंद ठेवायला सांगितल्या. यावरुन हे भीतीचेच लक्षण नाही का?, असं राऊतांनी अग्रलेखात म्हटलं होतं.