अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या आवारातील सुरक्षा भिंत पालिका पाडणार; रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेणार

संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतिक्षा’ बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यासाठी या दोघांनाही नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीस मिळताच के. व्ही. सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली.

  मुंबई : जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगत असलेली बंगल्याच्या आवारातील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याच्या जवळील जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने २०१७ मध्ये नोटीस पाठवली आहे. बच्चन यांनी जागा ताब्यात देण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र नेमकी किती जागा लागणार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने जागा ताब्यात घेण्यात आलेली नाही. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांच्याकडून उत्तर येताच अमिताभ यांच्या बंगल्याची जागा ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

  जुहूतल्या एन. एस. रस्ता क्रमांक १० येथून जुहू चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला उदंचन केंद्राकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या परिसरात एक शाळा, दोन मॉल आणि दोन चित्रपटगृहे आहेत. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागते. येथून जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष वेधून पालिकेने या मार्गाचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन हे कामही जवळपास पूर्णही झाले आहे.

  संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतिक्षा’ बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यासाठी या दोघांनाही नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीस मिळताच के. व्ही. सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही स्थगिती आदेश देण्यास नकार दिल्याने पालिकेने सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. अमिताभ यांनी आपल्या बंगल्यामधील काही जागा रस्तारुंदीकरण करण्यास देण्यास याआधीच मान्य केले आहे.

  लवकरच जागा ताब्यात घेऊ

  जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा संबंधितांकडून का ताब्यात घेतली जात नाही असा प्रश्न काँग्रेसच्या नगरसेविका टुलिप मिरिंडा यांनी पालिकेच्या के पश्चिम येथील प्रभाग समितीमध्ये उपस्थित केला आहे. २०१७ मध्ये नोटीस दिल्यानंतर ही जागा अद्याप पालिकेने ताब्यात घेण्यात आली नसल्याने रस्त्याचे रुंदीकरण अद्याप होऊ शकले नसल्याचे मिरिंडा यांनी निदर्शनास आणले. यावर उत्तर देताना फेब्रुवारी २०२१ मध्ये एकत्रित सर्व्हे केला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किती जागा लागेल याची माहिती मिळताच ती जागा ताब्यात घेतली जाईल अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  The security wall in the yard of Amitabh Bachchans pratiksha bungalow will be demolished by the BMC Occupy space for road widening