राज्यात प्राणवायूची तिव्र टंचाई असल्याने अन्य राज्याना प्राणवायू देण्यास राज्य सरकारचा केंद्राला स्पष्ट शब्दात नकार!

राज्याला दररोज ५५ हजार ते साठ हजार रूग्णांसाठी प्राणवायूची गरज आहे त्यामुळे राज्यातील गरज पूर्ण होत नसताना कर्नाटकला प्राणवायू पुरवठा शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात जेएसडब्ल्यूच्या माध्यमातून ४० मे टन, चाकण येथील उद्योगांकडून ९० मे टन तर मुरबाड येथील उद्योगांकडून ६० मेटन प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे.

    मुंबई : राज्य सरकारच्या अधिका-यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला भाज प्रणित सरकार असलेल्या कर्नाटक राज्याला प्राणवाय़ूचा पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले आहे. दोनच दिवसांपूर्वी बाजूच्या कर्नाटक राज्याला २४० मे. टन प्राणवाय़ू पुरविण्याबाबत ऑक्सिजन निर्मिती करणा-या कंपन्याना केंद्र सरकारने निर्देश दिले होते. मात्र सध्या राज्यात प्राणवायूची तिव्र टंचाई असून राज्यातून अन्य राज्याना प्राणवायू देता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

    प्राणवायूचा पुरवठा करण्यास असमर्थ
    या सूत्रांनी सांगितले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय, अन्न आणि औषध प्रशासन सचिव पिरामल सिंग, आणि परिवहन सचिव अविनाश ढाकणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत रविवारी दूरदृश्य माध्यमांतून संयुक्त बैठकीत भाग घेतला. त्यावेळी या अधिका-यांनी स्पष्ट शब्दांत केंद्र सरकारला प्राणवायूचा पुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त करत नकार दिला आहे. या सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लक्षात आणून देण्यात आले की, राज्याची रोजची प्राणवायूची गरज १४०० ते १५०० मेटन आहे मात्र सध्या राज्याला १२५० मे टन इतकाच पुरवठा होत आहे. या शिवाय राज्य सरकारने यापूर्वीच तामिळनाडूला ६० मे टन, गोव्याला १२ मे टन, तर मध्यप्रदेशला १० मे. टन प्राणवायू देण्याचे मान्य केले आहे.
     
    गुजरातमधून १२५ मेटन प्राणवायू
    राज्याला दररोज ५५ हजार ते साठ हजार रूग्णांसाठी प्राणवायूची गरज आहे त्यामुळे राज्यातील गरज पूर्ण होत नसताना कर्नाटकला प्राणवायू पुरवठा शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात जेएसडब्ल्यूच्या माध्यमातून ४० मे टन, चाकण येथील उद्योगांकडून ९० मे टन तर मुरबाड येथील उद्योगांकडून ६० मेटन प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. या शिवाय तळोजा येथूनही ६० मे टन पुरवठा होत आहे. राज्यात गुजरातमधून १२५ मेटन प्राणवायू पुरविला जात आहे.