राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार

राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल अशी अपेक्षा आहे, असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

    मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी मुुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर कडाडून टीका केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष करत टीकेचे बाण सोडले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

    दरम्यान नुकत्याच झालेल्या तौत्के चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठं नुकसान झाले आहे. महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल अशी अपेक्षा आहे, असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. तसेचं देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे. केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला 5 तर वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. लसीचा तुटवडा पाहता केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून सदर कंपनी सुरु करावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

    फडणवीसांची टीका

    ठाकरे सरकार हे बिनकामी सरकार आहे. कोकणातील संकटग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती.