राणीच्या बागेतील पेंग्विन बाबतची निविदा अखेर रद्द; वादानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय

पालिकेच्या अखत्यारीत पेंग्विनची देखभाल केली जाणार असून पालिकेचे डाॅक्टर पेंग्विनचे आरोग्य व्यवस्थापन करणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पालिकेच्या निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे काम पालिका स्वतः करू शकते त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज नाही.

    मुंबई : राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर मुंबई महापालिकेने पेंग्विनची देखभाल आणि आरोग्य व्यवस्थापनासाठी काढलेली १५ कोटींची निविदा रद्द केली आहे. त्यामुळे  पेंग्विन देखभालीचे काम कंत्राटदारांकडे न देता तूर्तास पालिकेने स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आहे.

    पेंग्विनच्या सन २०२१ ते २०२४ या तीन वर्षांच्या देखभालीसाठी पालिकेने १५ कोटी २६ लाख रुपये खर्चाची निविदा मागवली होती. त्यावरून मागील काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका सुरू केली होती. सन २०१८ ते २०२१ या कालावधीसाठी पेंग्विनच्या देखभालीसाठी दहा कोटी रुपये खर्च आला होता. या खर्चात आणखी पाच कोटीची वाढ करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर विरोधी पक्षांने आक्षेप घेत प्रसासनासह सत्ताधारी पक्षावर टीका केली होती. मागील काही दिवसांपासून यावर आरोप – प्रत्यारोप ने वाद रंगला होता. कोरोनाच्या संकटामुळे पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने तसेच पालिकेचे पशुवैद्यकीय डाॅक्टर उपलब्ध असताना प्रशासन नाहक उधळपट्टी करत असल्याचा आरोप काँग्रेस व भाजपने केला होता.

    दरम्यान, झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निविदा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या अखत्यारीत पेंग्विनची देखभाल केली जाणार असून पालिकेचे डाॅक्टर पेंग्विनचे आरोग्य व्यवस्थापन करणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पालिकेच्या निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे काम पालिका स्वतः करू शकते त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज नाही.

    कोरोनाच्या संकटामुळे विविध विकासकामे रखडली आहेत. त्याकडे पालिकेने लक्ष द्यावे. निविदा रद्द करून करदात्या मुंबईकरांचे पैसे पालिकेने वाचवले आहेत, असे राजा यांनी म्हटले आहे. तर मनसेने थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात होर्डिंग लावून शिवसेनेनेवर टीका केली आहे. ‘एवढा खर्च पेंग्विनना पोसण्यासाठी की पेंग्विन गँगला पोसण्यासाठी?’, असा प्रश्न विचारत या होर्डिंग द्वारे विचारला आहे.