सावधान : राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, मुख्यमंत्री महोदय राणें इतकच तिकडेही लक्ष द्या

  महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संक्रमीत रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. मागील काही महिने रुग्णसंख्या कमी होती. त्यामुळे, राज्य सरकारने निर्बंध शिथील केले मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही तिसऱ्या लाटेची चाहूल तर नाही ना? अशी भिती सामान्य जनतेला आहे.

  महाराष्ट्रात मृतांची संख्या वाढतेय

  महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत कोरोना संक्रमीत रुग्णांच्या संखेत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारी (25 ऑगस्ट) राज्यात 5,031 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 216 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. मागील 24 तासांत समोर आलेल्या रुग्णांची संख्या पाहिली तर, 4654 नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत तर 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बाब चिंतेची आहे.

  ऑक्सिजनची मागणी वाढली तर पुन्हा लॉकडाऊन आरोग्य मंत्र्यांचा इशारा

  राज्यातील वाढती रुग्णसंख्या व तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, “तिसऱ्या लाटेचा विचार करता 200 मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवणार असून 141 ऑक्सिजन प्लांटना मान्यता देण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत महाराष्ट्राला 3800 मेट्रीक टन ऑक्सिजन लागू शकतो. या तिसऱ्या लाटेत जेव्हा 700 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज लागेल त्या दिवशी लॉकडाऊन जाहिर करण्यात येइल.”

  कोरोनाला हलक्यात घेऊ नका तिव्रता अजून कमी झालेली नाही तज्ज्ञांचा इशारा

  निती आयोगाच्या तज्ज्ञांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रामाणात होण्याची शक्यता वर्तवली आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लागण झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढण्याची  शक्यता असून ही संख्या साधारण ४ ते ५ लाखांपर्यंत असू शकते. त्यामुळे पुढचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकारने किमान २ लाख ICU बेड्सची व्यवस्था करण्याची गरज आहे. असं निती आयोगाने म्हटलं आहे.

  आकडेवारी तज्ज्ञांचे इशारे समोर असतानाही महाराष्ट्रात मात्र सभा आणि आशिर्वाद यात्रांची चलती आहे. राजकीय राडे सुरु आहेत. याच सभा यात्रा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास जबाबदारठरु शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय ज्या तत्परतेने तुम्ही नारायण राणेंवर कारवाइ करता तेवढी तत्परता कोरोना प्रतिबंधासाठी दाखवावी. नाहीतर याच सभा यात्रा सामान्य जनतेच्या अंत्ययात्रेचं कारण असतील.