कोरोनाची तिसरी लाट थोपविणार! राज्य सरकारची तयारी पूर्ण; आरोग्य विभाग सतर्क

यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यात मोठ्या संख्येने लोक या साथीच्या कचाट्यात अडकले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 4 हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, यावेळी त्या-त्या जिल्ह्यांमध्ये 150 खाटांची सोय करण्यात येत आहे. डेल्टा प्रकारामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, अनेक लोकांनी या व्हेरिएंटविरुद्ध इम्यूनिटी विकसित केली आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट सांगता येत नसले तरी राज्य सरकारने या लाटेचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने पायाभूत सुविधांमध्ये दीडपट सुधारणा केली आहे.

    यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यात मोठ्या संख्येने लोक या साथीच्या कचाट्यात अडकले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 4 हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, यावेळी त्या-त्या जिल्ह्यांमध्ये 150 खाटांची सोय करण्यात येत आहे. डेल्टा प्रकारामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, अनेक लोकांनी या व्हेरिएंटविरुद्ध इम्यूनिटी विकसित केली आहे.

    संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन आणि प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये राज्यात साडेचारशेपेक्षा अधिक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता वाढवत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.

    राज्यात लसीकरणाची कामगिरी अतिशय उत्तम असून एकाच दिवशी 12 लाख लसींच्या मात्रा देऊन देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व उपस्थित फॅमिली डॉक्टरांनी आपल्या रुग्णांची तसेच नागरिकांची योग्य तपासणी करावी आणि त्या अनुषंगाने तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे, आवाहन कुंटे यांनी केले. गरज पडल्यास इतर राज्यांमधून ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वाहतूकव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही बाहेरून ऑक्सिजन मागविण्याची वेळ येऊ नये, यावर भर देण्यात येत असल्याचेही कुंटे यांनी यावेळी स्पष्ट केले.