कोरोनाचा धोका अजूनही कायम ; टास्क फोर्सने व्यक्त केली शक्यता

पहिल्या अनलॉकमध्ये देण्यात आलेली सूट याचा दुरुपयोग झाल्याने लोकांना दुसर्‍या लाटेला सामोरे जावे लागले. दुसरी लाट इतक्या वेगाने पसरली की हॉस्पिटलमधील बेड उरले नव्हते. म्हणूनच, लोकांनी या अनलॉकमध्ये निष्काळजीपणा केल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो.

  मुंबई: देशातील कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्याची आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत अनेक दिवसांपासून अतिशय संथ झालेल्या मुंबईचा धावता प्रवास पुन्हा सोमवारपासून सुरू झाला आहे. पण मुंबईकरांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ डॉक्टर सांगत आहेत.

  पहिल्या लाटेनंतर झालेल्या अनलॉकनंतर नागरिकांनी केलेले दुर्लक्ष खूपच भारी पडले होते. परिणामी, नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येत आहे. सध्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र खरे सत्य हे आहे की अजूनही दुसऱ्या लाटेचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. म्हणूनच या वेळी देखील नागरिक अनलॉक मधे बेफिकिरपणे वागत असतील तर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केली आहे.

  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मुंबई भरडली गेली. त्यात अनेक कुटूंब आणि मुलांनी आपला आधार गमावला. त्यांना उभे राहण्यासाठी बराच काळ लागेल, परंतु अजूनही आपल्याकडे इतकी भक्कम यंत्रणा नाही की आपण या साथीच्या आजारावर मात करण्यास सक्षम आहोत. मात्र कठोर लॉकडाउनने या लाटेला रोखण्यात बरीच मदत झाली. त्यामुळे होणाऱ्या अनलॉक नंतरही सर्वांनी काळजी घेणे अधिक महत्वाचे असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

  सध्या राज्याने कोरोना संक्रमणाच्या स्थितीवर पाच वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये विभागणी केली आहे. लेव्हल १ शहरांमध्ये सर्वाधिक सवलत दिली आहे आणि लेव्हल ५ मध्ये असलेल्या शहरांमध्ये कमीतकमी सवलत दिली गेली आहे. मुंबई सध्या लेव्हल३ मध्ये आहे. पहिल्या अनलॉकप्रमाणे यावेळेही, जर मुंबईकरानी निष्काळजी पणा दाखवला तर धोक्याची तीव्रता अधिक वाढू शकते असे मत टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.

  कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. ते म्हणाले की अनलॉकनंतर कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका तसाच राहणार आहे. हा धोका अजूनही कायम आहे. म्हणूनच, शेवटच्या अनलॉकमध्ये मुंबईकर ज्या प्रमाणे बेशिस्तपणे वागले तर तिसर्‍या लाटेपूर्वीच कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात.

  डॉ. गौतम भन्साळी म्हणतात की, पहिल्या अनलॉकमध्ये देण्यात आलेली सूट याचा दुरुपयोग झाल्याने लोकांना दुसर्‍या लाटेला सामोरे जावे लागले. दुसरी लाट इतक्या वेगाने पसरली की हॉस्पिटलमधील बेड उरले नव्हते. म्हणूनच, लोकांनी या अनलॉकमध्ये निष्काळजीपणा केल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, सामाजिक अंतर, घर सोडताना डबल मास्क आणि अनावश्यकपणे गर्दी टाळल्यास कोरोनाचा प्रसार थांबवू शकतात. मात्र, यावेळी प्रशासन नियम न पाळणाऱ्यांना विरोध कडक कारवाई करण्याची गरज आहे. आणि पालिकेच्या वतीने आम्ही पूर्ण खबरदारी घेणार असल्याचे मत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले.