दहशतवादी कारवायांप्रकरणी तिघांना १० वर्षांची शिक्षा, एनआयएच्या विशेष न्यायालयाने ठोठावली; दोघांची पुराव्याअभावी मुक्तता

राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २०१२ मध्ये नांदेडमधून मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक, मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास या पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.

    मुंबई : देशात अशांतता निर्माण करून हिंदू नेते तसेच पत्रकरांना मारण्याच्या कटातील सहभागाप्रकरणी महाराष्ट्रातील नांदेड येथून अटक करण्यात आलेल्या तिघांना मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली. तर दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

    राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २०१२ मध्ये नांदेडमधून मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक, मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास या पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.

    एनआयएनच्या म्हणण्यानुसार, अक्रम रोजगाराचे कारण सांगून सौदी अरेबियाला गेला आणि तेथे वास्तव्य करून तो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबाच्या लोकांशी संपर्कात आला. सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये अकरमने त्याच्या साथीदरांसह नांदेड, हैदराबाद आणि बेंगळूरुसह भारतातील विविध भागात प्रमुख हिंदू नेते, पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा कट रचला होता.

    मात्र, आरोपींना षड्यंत्र रचण्यापूर्वी त्यांना अटक करण्यात असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले. त्यावर मंगळवारी न्या. डी. ई. कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक यांना बेकायदेशीर कृती प्रतिबंधक अधिनियम (युएपीए) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत १० वर्षांची शिक्षा ठोठावली. तर मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास या दोन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.