चिकन आणि पनीरचं आमिष दाखवून रक्तदान शिबीर भरवण्याची वेळ ठाकरे सरकारवर आलेय म्हणजे… राम कदमांची जहरी टीका

मुंबई : रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचे सांगत ठाकरे सरकारने मुंबईत रक्तदान शिबीर भरवले. याचे बॅनरही झळकले. या मुद्द्यावरून भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर आणि सरकारवर जहरी टीका केली.

“राज्यात आणि मुंबईत रक्तसाठ्याचा तुटवडा आहे. या तुटवड्यासाठी ठाकरे सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप राम दकम यांनी केला आहे. रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदात्यांना चिकन किंवा पनीरचं आमिष दाखवलं जातंय. अशा प्रकारची नामुष्की ओढवण्यामागे सरकारचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचे टीकास्त्र राम कदम यांनी सोडले आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या माहीम-वरळी शाखेने या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचे बॅनर परिसरात झळकले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी या मतदार संघात ही बॅनरबाजी करण्यात आली.

दरम्यान, कोरोना काळात रूग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात आणि मुंबईत रक्ताची कमतरता भासत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विविध संबंधित अधिकारी यांनी आपल्या निवेदनातून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शिवसेनेच्या या आगळ्यावेगळ्या रक्तदान शिबीरावर राम कदम यांनी आक्षेप घेतला आहे.