तुम्हाला मिळणारे उपचार इतरांना मिळत नाहीत, उच्च न्यायालयाने आरोपी राकेश वाधवानला सुनावले

वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन देण्यात यावा, अथवा खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी वाधवानने उच्च न्यायालयाकडे केली होती. न्या. नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, जे.जे रुग्णालयात ड्युअल चेंबर पेसमेकर इम्प्लांटेशनची सुविधा उपलब्ध असून तेथे त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

    मुंबई – पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवानवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले. राकेश यांच्यावर पेसमेकर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुंबईतील सरकारी जे.जे रुग्णालयात करण्यात आल्यानंतर चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याची तक्रार वाधवान यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर नाराजी व्यक्त करत तुम्हाला सरकारी रुग्णालयात वर्षभरापासून उपचार मिळत आहेत ते इतरांना मिळत नाहीत, वारंवार एकच विषय आमच्या समोर येऊ नका, शब्दात तंबीही खंडपीठाने दिली.

    पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ४३५५ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान, दलजीत सिंग पाल, गुरुंनाम सिंग होठी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या राकेश वाधवानाची तब्येत बिघडल्याने पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल केले.

    वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन देण्यात यावा, अथवा खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी वाधवानने उच्च न्यायालयाकडे केली होती. न्या. नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, जे.जे रुग्णालयात ड्युअल चेंबर पेसमेकर इम्प्लांटेशनची सुविधा उपलब्ध असून तेथे त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी वाधवान यांच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यानुसार वाधवान यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया आवश्यक असून तसा अहवाल केईएम रुग्णालयाने दिला आहे.

    मात्र सरकारी रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचे राकेश यांच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत वाधवानला खडेबोल सुनावत पुढील सुनावणीदरम्यान, नवीन मुद्यावर युक्तिवाद करा, अशी ताकीद देत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.