ट्विटचा हवा तसा अर्थ काढता येतो, पार्थ पवारांच्या ट्विटवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पार्थ पवारांनी ट्विट केल्यानंतर त्यांचे चुलत बंधू रोहित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळायला हवा, परंतु आम्ही मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी नेहमीच आहोत.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय कडे सोपवल्याने महाराष्ट्रातील राजकारणात धुमाकूळ झाला आहे. पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांनी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने राष्ट्वादीमध्ये भूकंप आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणाची तपास सीबीआयकडे सोपवल्याचा धक्का राज्य सरकारला बसलेला असताना पार्थ यांनी आणखी एक धक्का दिला आहे. पार्थ पवारांनी ट्विटरवर ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत कोर्टाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले आहे. 

पार्थ पवारांनी ट्विट केल्यानंतर त्यांचे चुलत बंधू रोहित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळायला हवा, परंतु आम्ही मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी नेहमीच आहोत. तसेच याबाबतीत पार्थने काय ट्विट केले आहे, मला कल्पना नाही. पण त्या ट्विटचा प्रत्येकाला हावा तसा अर्थ काढता येतो. प्रत्येकाच्या विचारांवर अर्थ अवलंबून असतो. असे रोहित पवार म्हणाले. 

मागील महिन्यात पार्थ पवार गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांत सिंगच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी पत्र देऊन केली होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी धुसपूस झाली होती. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण सीबीआयकडे दिल्यावर सत्यमेव जयते असे सूचक वाक्यात ट्विट केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.