महिलेवर अत्याचार करताना तिच्या गुप्तांगामध्ये बोटांचा वापर करणे हा बलात्कारच; हाय कोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण

आपल्यावरील बलात्काराचा आरोप काढून त्या ऐवजी लैंगिक अत्याचाराचा आरोप करावा अशी मागणी आरोपीने याचिकेतून केली आहे. बलात्काराच्या व्याख्येनुसार लिंगाचा योनीत जबरदस्तीने प्रवेश होणे अपेक्षित असते. पण इथे आरोपीने बोटांचा वापर केल्याने हे प्रकरण लैंगिक अत्याचार म्हणून चालवण्यात यावे अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

    मुंबई : एखाद्या महिलेवर अत्याचार करताना तिच्या गुप्तांगामध्ये बोटांचा वापर करणे हा बलात्कारच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आणि एका गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी याचिकाकर्त्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली.

    मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षीय आरोपीवर २१ वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडिता आणि हा तरुण एकाच परिसरात राहतात. या तरुणाने पीडितेला जत्रेच्या निमित्ताने फिरायला नेले. जत्रेला नेल्यावर त्याने तेथील जवळच्याच एका निर्जन स्थळी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडिता रडू लागल्याने घाबरून त्याने तिला घरी सोडले.

    दरम्यान, पीडितेचे कुटुंबीय तिला शोधत होते. पीडित तरुणीने घरी गेल्यावर आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी आरोपीला पकडून त्याच्या विरुद्ध पोलिसात बलात्काराची तक्रार केली. त्यावर चाललेल्या खटल्यामध्ये आरोपीला बलात्कार आणि अपहरण प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर न्या. रेवती मोहिते ढेरे यांच्यासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

    आपल्यावरील बलात्काराचा आरोप काढून त्या ऐवजी लैंगिक अत्याचाराचा आरोप करावा अशी मागणी आरोपीने याचिकेतून केली आहे. बलात्काराच्या व्याख्येनुसार लिंगाचा योनीत जबरदस्तीने प्रवेश होणे अपेक्षित असते. पण इथे आरोपीने बोटांचा वापर केल्याने हे प्रकरण लैंगिक अत्याचार म्हणून चालवण्यात यावे अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

    मात्र, बोटांचा वापर हा देखील बलात्कारच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले तसेच सदर प्रकरणात जरी लिंग आणि योनीचा संबंध आलेला नसला तरीही पीडितेच्या अंतर्गत अवयवांना जखमा झालेल्या आहेत. तसेच तिच्यावर अत्याचार झाले असल्याचे सिद्ध करण्यासाठी जे न्यायवैद्यकीय पुरावे जमा झाले आहेत, ते आरोपीशी तंतोतंत जुळत आहेत. त्यामुळे बलात्काराचा आरोप रद्द करता येणार नाही. असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.