…तर महापौरांविरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; भाजप आमदाराचा इशारा

समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी, गोवंडी येथील पालिकेच्या निर्माणाधिन उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी पालिका बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत जानेवारी २०२१ मध्ये पत्राद्वारे केली होती. त्यावर पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिले होते. याबाबतची माहिती मिळताच हिंदू जनजागृती समितीतर्फे त्यास आक्षेप घेण्यात आला होता. याबाबत समितीने बाजार व उद्यान समितीचे उपाध्यक्ष तुकाराम पाटील आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना भेटुन एक निवेदन दिले. त्यामध्ये या उद्यानाला हिंदूंवर अत्याचार, अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानचे नाव देण्यास विरोध दर्शवला होता. त्यावेळी, महापौरांनी, "टिपू सुलतान याचे मुंबईसाठी योगदान काय ? त्याचे नाव इथे कशासाठी ? याविषयी प्रशासकीय नियमांची पडताळणी करून मी लक्ष घालते", असे आश्वासन समितीला दिले होते.

    मुंबई : गेल्या २०१३ ला मी भाजपचा नगरसेवक असताना स्थापत्य समितीवर कधीच सदस्य पदावर नव्हतो. त्यामुळे गोवंडी येथील रस्त्याला टिपू सुलतान याचे नाव देण्याबाबत अपक्ष नगरसेवकाच्या प्रस्तावाला अनुमोदन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, या प्रकरणात माझे नाव गोवले आहे, असे स्पष्ट करीत भाजपचे आमदार अमित साटम यांनी महापाैरांचा निषेध केला आहे. महापौरांनी येत्या सात दिवसांत या प्रकरणातील अधिकृत कागदपत्रे सादर करून तसे सिद्ध न केल्यास त्यांच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे आव्हान त्यांनी महापाैरांना दिले आहे.

    समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी, गोवंडी येथील पालिकेच्या निर्माणाधिन उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी पालिका बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत जानेवारी २०२१ मध्ये पत्राद्वारे केली होती. त्यावर पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिले होते. याबाबतची माहिती मिळताच हिंदू जनजागृती समितीतर्फे त्यास आक्षेप घेण्यात आला होता. याबाबत समितीने बाजार व उद्यान समितीचे उपाध्यक्ष तुकाराम पाटील आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना भेटुन एक निवेदन दिले. त्यामध्ये या उद्यानाला हिंदूंवर अत्याचार, अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानचे नाव देण्यास विरोध दर्शवला होता. त्यावेळी, महापौरांनी, “टिपू सुलतान याचे मुंबईसाठी योगदान काय ? त्याचे नाव इथे कशासाठी ? याविषयी प्रशासकीय नियमांची पडताळणी करून मी लक्ष घालते”, असे आश्वासन समितीला दिले होते.

    मात्र १५ जुलै रोजी पालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत सदर उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव चर्चेला आला असता भाजप सदस्यांनी टिपूचे नाव उद्यानाला देण्यास तीव्र विरोध दर्शवत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सदर उद्यानाचे काम अपूर्ण असून प्रस्तावात अपूर्ण माहिती दिल्याचे कारण देत प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविण्याची मागणी केली. यावेळी मोठा गदारोळ झाला होता. समिती अध्यक्ष यांनी अखेर प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवत सभा तहकूब केली होती. त्यानंतर, महापौर किशोरी पेडणेकर यांनी, १६ जुलै रोजी पत्रकारांशी बोलताना, २०१३ मध्ये शिवसेना व भाजप यांची युती असताना गोवंडी भागात एका अपक्ष नगरसेवकाने रस्त्याला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी केली असताना भाजपचे तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांनीच त्यास अनुमोदन दिले होते, अशी पोलखोल करीत आता टिपू सुलतान याच्या नावाला भाजपचा विरोध का ? असा सवाल उपस्थित करीत भाजपला लक्ष केले.

    या प्रकरणात, भाजपचे तत्कालीन नगरसेवक व आताचे आमदार अमित साटम यांचे नाव आल्याने ते कमालीचे अस्वस्थ झाले असून त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौरांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण देत महापौरांचा निषेध केला आहे. तसेच, पुढील सात दिवसात महापौरांनी, सदर आरोप कागदपत्रांसह सिद्ध न केल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसान भरपाईचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे.