आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, याचा परिणाम म्हणून सोमवार आणि मंगळवारी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तविली आहे.

    मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसानं सगळीकडे थैमान घातलं आहे. मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला होता. त्यामुळे वातावरणात खूप बदल झालेले पहायला मिळाले.

    दरम्यान या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. आपल्याकडे मान्सूनची सुरुवात सर्वसाधारपणे जून ते सप्टेंबर या काळात होते. मात्र यावेळेस परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला आहे. अशातच आता मोसमी वारे परतीला जाण्यासाठी पूरक वातावरण असून, याचे परिणाम राज्यातील काही भागांवर दिसून येणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रातील हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, याचा परिणाम म्हणून सोमवार आणि मंगळवारी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तविली आहे.

    तर राजस्थानच्या वायव्य भागातून परतीच्या पावसाला सुरुवात होते. त्यानंतर हवामान खात्याच्या निरीक्षण केंद्रांवर सतत नोंदणी ठेवण्याचं काम सुरू असतं. अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात मान्सूनला अनुकूल काही परिस्थ‌िती दिसत असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर मग परतीच्या पावसाचे संकेत दिले जात नाहीत.