‘हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील!’ संजय राऊत यांचा भाजपवर थेट निशाणा

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता.

    या प्रकारामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘परप्रांतीयांची नोंद ठेवा’ असे पोलिसांना आदेश दिले. या आदेशांवर भाजपने खुप टीका केली. महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत का? असा सवाल राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून विचारण्यात येत आहे. यावरुन आता संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून भाजपवर निशाणा साधला आहे.

    ‘साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणानंतर भाजपने परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढला. मुंबईत बाहेरून आलेल्यांवर लक्ष ठेवा, असे मुख्यमंत्री पोलिसांना सांगतात व त्याचे राजकीय भांडवल भाजपसारखे पक्ष करतात. हे राजकारण उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी व मुंबई महानगरपालिकेसाठी चालले आहे. एक दिवस हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील!’ अशी थेट टीका सामनाच्या रोकठोकमधून खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

    महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. तशी ती आता फुटलेली दिसत आहे. परप्रांतीयांचा विषय हा फक्त एखादे राज्य किंवा मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या शहरांचा राहिलेला नाही. तो राष्ट्रव्यापी विषय बनला आहे. भूमिपुत्रांचा लढा व परप्रांतीयांची समस्या हे दोन्ही वेगळे विषय आहेत. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले.

    बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली, त्यावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणाऱया प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले.

    दरम्यान, मुंबई पश्चिम उपनगरातील साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा बलात्कार प्रकरणाने संपुर्ण महाराष्ट्र हादरला. एका विकृत परप्रांतीय व्यक्तीने ३२ वर्षांच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने त्या पीडित महिलेचा रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. त्यानंतर राजकीय वादविवाद सुरु झाले.