“त्यांनी यावं पाहुणचार घ्यावा. पण, अजीर्ण व्हावा इतका नाही” शरद पवारांचा केंद्राच्या तपास यंत्रणांना टोला

जबाबदार अधिकारी जबाबदार माणसावर बेछुटपणे आरोप करतो हे पूर्वी कधी घडलं नव्हतं. देशमुखांनी बाजूला व्हायची भूमिका घेतली. आता आरोप करणाऱ्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. देशमुख बाजूला झाले आणि हे गृहस्थ गायब झाले आहेत. देशमुखांची चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा मारला.

    मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर आपली मते मांडली आहेत. केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

    या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. “पाहुण्यांनी पाहुणचार घ्यावा, पण अजीर्ण व्हावं, इतका पाहुणचार घेऊ नये”, असं पवार म्हणाले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

    आयकर विभागाच्या छाप्यांविषयी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले, “यासंदर्भात अजित पवारांचं स्टेटमेंट मी वाचलं. ते असं होतं की मी राज्याचा अर्थमंत्री आहे. सरकारचे रिसोर्सेस महत्त्वाचे असतात. त्याची रिकव्हरी करण्यासाठी केंद्रानं काही भूमिका घेतली तर मी त्याला विरोध करणार नाही ही माझीही अर्थमंत्री म्हणून जबाबदारी आहे. वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी बोलेन. पण ही चौकशी थांबल्यानंतर बोलेन असं अजित पवार म्हणाले. पण ती चौकशी अजून सुरू आहे. मी माहिती घेतली की असे पाहुणे अनेक ठिकाणी येतात. एक-दोन-तीन दिवस असतात. पण आजचा सहावा दिवस आहे. पाहुणचार घ्यावा. पण अजीर्ण व्हावा इतका पाहुणचार घेऊ नये”.

    जबाबदार अधिकारी जबाबदार माणसावर बेछुटपणे आरोप करतो हे पूर्वी कधी घडलं नव्हतं. देशमुखांनी बाजूला व्हायची भूमिका घेतली. आता आरोप करणाऱ्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. देशमुख बाजूला झाले आणि हे गृहस्थ गायब झाले आहेत. देशमुखांची चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा मारला. त्याच घरात पाचवेळा जाऊन छापा मारण्याचा विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे.