हा कोरोनाचा तिसरा डाव तर नाही ना? मुंबईतील कोरोना संसर्ग आणखी घटला; आता लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे लक्ष

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर चार टक्क्यांच्याही खाली आला आहे. त्यामुळं आतातरी लोकल ट्रेन सुरू होणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  मुंबई: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारनं लावलेले करोना निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठविण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गाचा दर (Corona Positivity Rate in Mumbai) व ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेच्या आधारे हे निर्बंध उठवले जात आहेत. या संदर्भातील ताजी आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईतील संसर्गाचा दर चार टक्क्यांच्याही खाली आला आहे. तर, ऑक्सिजनची सुविधा असलेले ७५ टक्क्यांहून अधिक बेड रिकामे झाले आहेत. त्यामुळं मुंबईतील निर्बंध शिथील होण्याची शक्यता आहे.

  राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्यानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यभरात सध्या १६,५७० ऑक्सिजनयुक्त बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. मात्र, ही संख्या सातत्यानं कमी होत आहे. मुंबईत सध्या २३.५६ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. तर, मुंबई व उपनगरातील करोना संसर्गाचा दर ३.७९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मागील वेळेस देखील मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर घसरला होता. मात्र, मुंबईचा पसारा व गर्दी पाहता खबरदारी म्हणून निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. नव्या परिस्थितीत मुंबईबाबत काय निर्णय होणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  कोरोनाचे निर्बंध शिथिल होण्याची शक्यता दिसताच मुंबईकरांमध्ये लोकल ट्रेनची चर्चा सुरू होते. लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंद असल्यामुळं सध्या मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कामाची ठिकाणं गाठताना लोकांची दमछाक होत आहे. तर, ट्रेन बंद असल्यामुळं छोटमोठे रोजगार बुडाले आहेत. आता कोरोना संसर्गाचा दर चार टक्क्यांच्याही खाली आल्यामुळं काही प्रमाणात तरी लोकल दिलासा मिळणार का?, याविषयी उत्सुकता आहे.

  ठाण्यालाही मोठा दिलासा

  ठाणे जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दरही पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. सध्या हा दर ४.६९ टक्के आहे. तर, ठाण्यात जवळपास ९० टक्के ऑक्सिजन बेड सध्या रिकामे झाले आहेत. ठाणे शहर व जिल्हा प्रशासनासाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

  third wave local trains may get green signal corona positivity rate in mumbai below 4 percent