महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा हा अर्थसंकल्प, सामनातून अजित पवार यांचे कौतुक

अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम आहे. त्यामुळे ते कितीही आगपाखड करत असले, तरी अर्थसंकल्पातील एकंदर तरतुदी पाहता राज्यातील महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो, असे सांगत या अर्थसंकल्पाचे आजच्या सामना अग्रलेखातून कौतुक करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे.

  मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल (सोमवार) अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधी पक्षांकडून टीकाही करण्यात आल्या. परंतु हे अर्थसंकल्प महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा आहे, असं म्हणत दैनिक वृत्तपत्र सामनातून अजित पवार यांचे कौतुक करण्यात आले आहे.

  अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम आहे. त्यामुळे ते कितीही आगपाखड करत असले, तरी अर्थसंकल्पातील एकंदर तरतुदी पाहता राज्यातील महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो, असे सांगत या अर्थसंकल्पाचे आजच्या सामना अग्रलेखातून कौतुक करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही सामनामध्ये म्हटले आहे.

  सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं नाही, याचं भान अर्थमंत्र्यांनी ठेवलं

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केला. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही, याचे पुरेपूर भान ठेवत अर्थमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागांचा, विविध क्षेत्रांचा आणि घटकांचा साकल्याने विचार करून एक सर्वसमावेशक आणि समतोल म्हणावा असा अर्थसंकल्प सादर केला.

  अर्थमंत्री अजित पवार प्रशंसेस पात्र

  एकीकडे सव्वा वर्षापासून घोंगावत असलेले कोरोनाचे वैश्विक संकट, लॉकडाऊनमुळे बाजारपेठा, व्यापार-उद्योग आणि एकूणच अर्थव्यवस्थेचा झालेला कोंडमारा त्यातून राज्याच्या महसुलात झालेली घट व तिजोरीला बसलेला फटका आणि जीएसटी व केंद्रीय करांचा हजारो कोटींचा केंद्रीय सरकारकडे थकलेला परतावा अशा चौफेर संकटांचे आव्हान असताना अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे हे तसे जिकिरीचेच काम होते. मात्र, तारेवरची ही कसरत लीलया पूर्ण करत अर्थमंत्री अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा विकासाला चालना देणारा जो दुसरा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहेत.