अजित पवारांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचं हे कारस्थान; नवाब मलिक यांचा आरोप

भाजपने अजित पवार यांच्याविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यानंतर अजित पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

    मुंबई : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आला होता. त्यानंतर भाजपने अजित पवार यांच्याविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यानंतर अजित पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आणि परिवाराच्याबाबतीत ज्या पद्धतीनं बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचं आहे. साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. ज्या काही कायदेशीर कारवाई असतील त्या ईडीकडून करण्यात येत आहे. पण अजितदादा आणि त्यांच्या परिवारातील कुणीही बेकायदेशीर कामे केलेली नाहीत. त्यांची बदनामी करण्यासाठी बातम्या पेरल्याचं कटकारस्थानं केलं जात आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

    दरम्यान कारवाई करण्यात आलेल्या सहकारी बँकेत जवळजवळ 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली असल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात समाजसेवक अण्णा हजारेंनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे मुंबई शाखेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत कारवाई केली होती.

    तसेचं राष्ट्रवादी सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकलाय. ईडीकडे 5 वर्षे फेऱ्या मारल्या. 43 कारखान्यांची यादी हवी तर पुन्हा देतो. ईडी ही राजकीय दृष्ट्या काम करत आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी साखर कारखाने विकत घेतले आहेत. सर्व कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.