या वर्षी सुद्धा ढोल ताशाचा आवाज घुमणार नाही

गणेशोत्सवामध्ये ढोलताशा, लेझीम पथक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा असं शासनाने म्हटले आहे. यामुळे यंदा गणेशोत्सवामध्ये दणाणून सोडणार्‍या ढोल ताशांचा आवाज आपणास ऐकायला मिळणार नाही. परिणामी ढोल पथक, लेझीम पथकासह अन्य वाद्य वृंदांवर उपजीविका करणाऱ्या कलाकारांना याचा मोठा फटका बसणार आहे.

    मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. यामुळं मुंबई पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळे मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणेशोत्सव साधेपणाने साजरे करणार आहेत. याचा फटका अनेक घटकांना बसणार आहे. तसा तो ‘ढोल पथक मंडळांना’ सुद्धा बसणार आहे. राज्यात नाशिक ढोल, पुणेरी ढोल ताशा पथक, मुंबईत डबेवाल्यांची अनेक ढोल पथके कार्यरत आहेत, कोल्हापुरी लेझीम पथक आणि साताऱ्याचे ढोल पथक अशी प्रसिद्ध ढोल पथके आहेत. या सर्व ढोल पथकांना गणेशोत्सव सणात याचा फटका बसणार आहे.

    सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच घरगुती गणपतींना या ढोल ताशांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. साधारण दोन तास वाजवण्याची १५ ते २०  हजार रूपये ढोल मंडळांना मिळते. अशा प्रकारे प्रत्येक ढोल पथक लाखो रूपये कमाई होत असे. या कमाईला आता मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुकावे लागणार आहे. सर्व अर्थाने कोरोनामुळे आर्थिक घडी पार विस्कटून गेली आहे, अशी प्रतिक्रीया मुंबईतील काही ढोल ताशावाल्यांनी दिली आहे. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये ढोलताशा, लेझीम पथक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा असं शासनाने म्हटले आहे. यामुळे यंदा गणेशोत्सवामध्ये दणाणून सोडणार्‍या ढोल ताशांचा आवाज आपणास ऐकायला मिळणार नाही. परिणामी ढोल पथक, लेझीम पथकासह अन्य वाद्य वृंदांवर उपजीविका करणाऱ्या कलाकारांना याचा मोठा फटका बसणार आहे.

    कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात सण समारंभ, उत्सव, मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. गणेशोत्सवावर अनेक घटक अवलंबून असतात. यामध्ये श्री गणेशाची मूर्ती तयार करण्यापासून ते विसर्जनापर्यंत अनेक घटकांमार्फत वेगवेगळ्या सेवा आणि वस्तु पुरविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हा सण मंगलमय व्हावा यासाठी वाद्यवृंद, ढोल पथक, लेझीम पथक यांचा मोलाचा वाटा असतो. बाप्पांच्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळी वाजत-गाजत श्रींची मिरवणूकही काढली जाते. मात्र यंदा मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोरोनामुळं राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केले आहे. या उत्सवामध्ये लोकांची गर्दी होऊ नये आणि पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू नये, यासाठी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ढोल ताशा पथक, लेझीम पथक यासह अन्य करमणुकीच्या पथकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे.